नाशिक - सुट्टीवर आलेल्या सैनिकाने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. २ वर्षांपूर्वीच या दाम्पत्याचे लग्न झाले होते. त्यांना ३ महिन्यांची मुलगी होती. या हत्येने शहरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
चैताली बावा असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. चैतालीचा पती सुनील बावा हा श्रीनगर येथे लष्करात नोकरी करतो. दहा दिवसांसाठी सुनील बावा हा नाशिकला सुट्टीवर आला होता. चैताली हिच्याकडे वारंवार माहेरहून पैसे आणण्याचा तो तगादा लावत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली. त्यातूनच हा वाद झाल्याने सुनील याने गळा दाबून तिची हत्या केली.
हत्येनंतर सुनील याने स्वतःला संपविण्याचाही प्रयत्न केला. त्याने चाकूने स्वतःच्या हातावर वार करून घेत नस कापून घेतली होती. पत्नीचा खून केल्यानंतर सुनीलने कल्याण येथे राहणाऱया चुलत भावला फोन केला होता. त्यावेळी भारती याने वहिनी कुठे आहे? असे विचारले असता आरोपी बावा याने ती स्वर्गात गेली असे सांगितले. त्यावेळी चुलत भाऊ असलेल्या भारती याला संशय आल्याने त्याने मुलीच्या माहेरी फोन करून याबद्दलची माहिती दिली. त्यावरून ही सगळी घटना उघडकीस आली. चैतालीची हत्या केल्याने सुनील बावा याच्यावर म्हसरुळ पोलिसांनी खुनाचा दाखल केला आहे.