नाशिक - चांदशी शिवारातील शॅक हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. हॉटेलमध्ये हुक्का सेवन करताना आढळलेल्या 23 ग्राहकांसह हॉटेल मालकावर व व्यवस्थापनावर कोटपा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकमधील चांदशी शिवारातील हॉटेल शॅकमध्ये हुक्याची विक्री व सेवन केले जात असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळाली होती. त्या आधारे मंगळवारी रात्री ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने हॉटेल मालक शिवराज वावरे व्यवस्थापक सचिन सांगळे यांच्या सह तीन वेटर व 23 ग्राहकांविरोधात कोटपा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कारवाई सुरूच राहणार
हॉटेलमधील हुक्का पार्लर विरोधात कारवाई सुरुच रहाणार आहे. तसेच हॉटेलपर्यंत हुक्का पोहोचवण्याचे स्त्रोत शोधून त्यावरही कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. नाशिक शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेला चांदशी शिवार हुक्याचा अड्डा बनला आहे. इथे अनेक हॉटेलमध्ये अनधिकृतपणे हुक्याची आणि दारूची विक्री केली जाते. त्यामुळेच ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणत युवक-युवतींचा वावर असतो. अनेक वेळा नागरिकांनी याबाबत पोलिसात तक्रारी केल्या होत्या. मात्र आता यावर कारवाई करण्यात येत आहे.
हेही वाचा - आर्थिक गुन्हे शाखेची भाजपा आमदार प्रसाद लाड यांना नोटीस