नाशिक - पश्चिम बंगालसारखे धक्के आता वारंवार बसणार असून तुम्ही किती लोकांवर रागावणार, तुम्ही आता पराभवाचीदेखील सवय करून घ्यायला पाहिजे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. तसेच भुजबळ तुरुंगात असताना त्यांचे पुतणे मला भेटले, असा दावा चंद्रकात पाटील यांनी केला होता. त्यास प्रतिउत्तर देताना माझ्या आधी समीरला अटक झाली होती. मग ते तुरुंगात असताना चंद्रकांत पाटील यांना कधी भेटले, असा प्रतिप्रश्न भुजबळ यांनी उपस्थित करत चंद्रकात पाटील यांचा दावा फेटाळून लावला आहे. दरम्यान, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना जास्त जोरात बोलू नका, अन्यथा महागात पडेल, असा इशारा दिला होता.
पराभव सहन करण्याची सवय व्हायला हवी -
पश्चिम बंगाल निवडणुकीवर प्रतिक्रिया दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ जामिनावर बाहेर असून महागात पडेल, असा इशारा दिला होता. त्यास सोमवारी भुजबळांनी प्रत्यूत्तर दिले आहे. ममता दीदी झाशीच्या राणी सारख्या एक हाती लढल्या. दीदींनी 'मेरा बंगाल मैं नही दुंगी', असे सांगितले. माझ्या या बोलण्यावर रागावण्यासारख काय आहे, पराभव सहन करण्याची सवय व्हायला हवी.अचानक झालेल्या पराभवाने मानसिक गडबड होणे सहाजिक आहे, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
वडाच तेल वांग्यावर काढू नका -
समीर भुजबळ जेलमध्ये असताना त्यांच्याकडे मदत मागायला कसा जाईल. सीबीआय, ईडी यांचा राजकीय उपयोग होतो, हे माहिती होत. आता न्यायदेवता पण त्यांच्या हातात आहे का, असा मला प्रश्न पडला आहे. तुम्ही सांगाल ते करायला, न्याय देवता म्हणजे सीबीआय, ईडी नाही. त्यामुळे वडाच तेल वांग्यावर काढू नका, असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. तसेच बंगाल निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य नाही, तर स्पष्ट हात होता. शरद पवारांनी ममता बॅनर्जींना मदत केली, हे जगजाहीर आहे, असे भुजबळ यांनी या वेळी सांगितले.
पुनावाला यांना धमकी देणार्यांना शोधून काढा -
पुनावाला यांनी लंडनमध्ये जाऊन सांगितले, की मोठ्या व्यक्तींनी त्यांना धमक्या दिल्या, तर सीबीआय, आयबी यांनी इतर काम करण्यापेक्षा धमकी देणार्यांना शोधून काढाले पाहिजे. पुनावाला यांना संरक्षण देऊन लस निर्मितीच काम सुरू करा, असेही ते म्हणाले. सुप्रीम कोर्टानेदेखील आता लॉकडाऊन बाबत सांगितले आहे. त्यावर लवकरच केद्रसरकार निर्णय घेईल, अशी अपेक्षा असल्याचे मत भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा - औरंगाबाद : कोरोनामुळे 9 महिन्यांच्या मुलीचा मृत्यू, आतापर्यंत चार बालकांनी गमावला जीव