नाशिक - अयोध्या येथे भव्य श्रीराम मंदिराचा पायाभरणी समारंभ ५ ऑगस्ट २०२० रोजी संपन्न होत आहे. या निमित्ताने श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गोदावरीचे पवित्र जल व त्र्यंबकेश्वर नगरीतील पवित्र माती सदर कार्यक्रमासाठी आज विधिपूर्वक पूजन करून रवाना करण्यात आले.
त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघ व अयोध्येत कारसेवेप्रसंगी गेलेले श्रीरामभक्त कारसेवक व मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तीर्थराज कुशावर्त येथे ब्रह्मगिरीवरून आणलेल्या मूळ गोदावरीच्या तीर्थाचे पवित्र जल आणि कुशावर्त तीर्थाचे विधिपूर्वक पूजन करण्यात आले.
अयोध्या येथील श्रीराम मंदिर भूमिपूजन समारंभास महाराष्ट्रातून विशेष निमंत्रित असलेले १००८ महंत जितेंद्रनाथ महाराज यांच्याकडे सदर कलश सुपूर्द करून तो अयोध्येला रवाना करण्यात आला. या प्रसंगी त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त आणि पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांचे हस्ते गोदावरी व पवित्र मातीचे पूजन करण्यात आले.