येवला (नाशिक) - सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकांमध्ये आजही पाणी साचले असल्याचे चित्र दिसत असून अक्षरशः पिकांना कोंब फुटले आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरसकट पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.
पिके पाण्यात, मोठे नुकसान -
गेल्या आठवड्यापासून सतत कोसळणाऱ्या पावसाने येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागात पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वत्र पिकांमध्ये पाणीच पाणी साचले होते. आज देखील पिकांमध्ये पाणी असून या पावसाच्या पाण्यामुळे मका, कांदा,भुईमूग, सोयाबीन यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे सरसकट करावे अशी मागणी तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील शेतकरी करीत आहे. मक्याच्या बियांना कोम फुटले असून सोयाबीन देखील पावसाने भिजले आहे. आता सोयाबीन वाळवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून कांदा पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शासनाने सरसकट पंचनामे करावे, अशी मागणी येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भागातील शेतकरी करीत आहे.
पथकाची नेमणूक -
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करण्याकरीता तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांचे पथक नेमले असून प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे ते करणार आहेत. सदर अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार प्रमोद हिले यांनी दिली आहे.