नाशिक - जिल्ह्यात काल पावसाने जोरदार हजेरी लावली. आठ तास झालेल्या दमदार पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे दुष्काळाने चिंताग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात काल (रविवार) पावसाने दमदार हजेरी लावली होती. अवघ्या आठ तास बरसलेल्या पावसाने जिल्ह्यातील पाणी संकट काही प्रमाणत कमी केले आहे. काल नाशिक जिल्ह्यात सरासरी ५७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात १५ टक्के तर दारणा धरणात १७ टक्के इतका पाणी साठा वाढला आहे.
मागील महिन्याभरापासून पावसाने वक्रदृष्टी दाखवल्याने नाशिक शहारत पाणी कपातीचे संकट निर्माण झाले होते. गंगापूर धरणाचा पाणीसाठा हा १३ टक्के इतकाच शिल्लक राहिल्याने महानगर पालिकेने शहरात एक वेळेचा पाणी पुरवठा बंद ठेवला होता. त्याचबरोबर गुरुवारी पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. अशात काल झालेल्या दमदार पावसामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कालच्या पावसामुळे या प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.
गंगापूर धरण- 34 टक्के
दारणा धरण- 38 टक्के
पालखेड धरण- 18 टक्के
भावली धरण- 39 टक्के
काश्यपी धरण- 24 टक्के
नादुरमध्यमेश्वर- 54 टक्के
गौतमी गोदावरी धरण- 21 टक्के