नाशिक - जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असतांना दुसरीकडे सलग दुसऱ्या दिवशी (गुरूवारी) झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.नाशिक शहरासह दिंडोरी,निफाड अभोणा,ओझर आदी ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला. यात गहू, हरबरा, टोमॅटो, मिरची, कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे शहरी भागासोबत ग्रामीण भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता.
निफाड तालुक्यात शेतकऱ्यांची धावपळ
अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यातील ओझर, सुकाणे, दिंडोरी या भागातील शेतकऱ्यांचे गहू, हरभरा झाकण्यासाठी धावपळ झाल्याचे दिसून आले. अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. बदलत्या हवामानात नागरिकांनी आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.
अभोणा भागात गारपीट
कळवण तालुक्यातील आभोणा,पाळे परिसरात (बुधवारी)28 तारखेला सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे टोमॅटो, मिरची,कांदा,कोथिंबीरसह पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच झाडांवर बहरलेल्या आंब्यांना वादळी वाऱ्यामुळे तडाखा बसला आहे.