लातूर - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. आतापर्यंत 70 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, मृताच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना वाहनाची सोय होत नाही. परिणामी त्यांनी पीपीई किट घालून रुग्णवाहिकेऐवजी थेट रिक्षातून स्मशानभूमीपर्तंत जावे लागत आहे.
जिल्ह्यात एकूणकोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा 1350 वर पोहोचला आहे. उदगीर येथील सामान्य रुग्णालय वगळता जिल्ह्यातील अधिक रुग्ण हे उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे रुग्णांवर शहरातीलच स्मशानभूमीत मनपाचे कर्मचारी अंत्यविधी करतात. याकरिता आठ जणांचे पथक नेमण्यात आले आहे. मात्र, स्मशानभूमीत जाताना रुग्णवाहिकेत मृतदेहासह 3 कर्मचारी प्रवास करतात. परंतु, पथकातील उर्वरित 5 कर्मचाऱ्यांनी स्मशानभूमीत जाण्यासाठी रिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र तीच रिक्षा पुन्हा प्रवासी सेवेत वापरली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - आसाममध्ये महापुराचा कहर; ब्रम्हपुत्रेने धोका पातळी ओलांडली, 93 जणांचा बळी
आरोग्य कर्मचारी पीपीई किट घालून दिवसाकाठी 3 ते 4 मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात. मात्र, या कर्मचाऱ्यांना अंत्यसंस्काराला जाण्यासाठी योग्य वाहनाची सुविधा उपलब्ध नाही. शिवाय एका महिन्यापासून त्यांना वेतनही मिळालेले नसल्याची खंत आरोग्य कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली.
एकीकडे लोकप्रतिनिधी सर्व सोई सुविधा पुरविल्या असल्याचे सांगत आहेत तर दुसरीकडे खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मूलभूत सोई- सुविधा देखील मिळत नाही आहे. दोन दिवसांपूर्वीच महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी रुग्णांसाठी सिटीबसचे रूपांतर रुग्णवाहिकेत केल्याचे सांगितले. मात्र, मनपाच्या कर्मचाऱ्यांना एक वाहनही उपलब्ध नसल्याने खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत आहे. याबाबत मनपा आयुक्त देविदास टेकाळे यांनी त्यांच्याासाठी त्वरित वाहनाची व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले आहे.