नाशिक - शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला केंद्र सरकारच्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारित येतो. महाराष्ट्र सरकारने तो स्वता:च्या अखत्यारित घ्यावा. शिवाजी महाराज यांच्या काळात असलेले वैभव रायगडाला परत मिळवून द्यावे, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ पर्यटन मंत्रालयाकडे केली आहे.
गंगापूर धरण परिसरातील 'ग्रेप पार्क रिसोर्ट'चे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण झाले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. विरोधी पक्षनेते फडणवीस व सेना नेते संजय राऊत यांच्या भेटीबाबत विचारले असता, या भेटीतून कोणताही भूकंप होणार नाही, असे सांगत हे सरकार पाच वर्षे टिकेल असा दावा त्यांनी केला. काही मंत्र्यांना वीजबिलच आले नाही, यावर भाष्य करताना लॉकडाऊन काळात मंत्री जर घरी राहिलेच नाहीत, तर बिल कसे येणार असे ते म्हणाले. ओल्या दुष्काळासंदर्भात दोन दिवसात मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
'प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक शहर व जिल्ह्याला मोठी धार्मिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. आज नाशिकची वाटचाल मंत्र भूमीकडून यंत्र भूमीकडे होत असतांना नाशिकमध्ये बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना नाशिकमध्ये आल्यावर किमान दोन तीन दिवस वास्तव्य करावे या हेतून शहर व जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यात आलेला आहे. नाशिक जिल्ह्याच्या सौंदर्यात भर पडणारी व पर्यटन केंद्रांचा अमुलाग्र विकास साधणारी मोठ्या प्रमाणात पर्यटन विकासची कामे करण्यात आली आहेत,' असे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले.
नाशिक शहरालगत केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून गंगापूर येथे 'मेगा पर्यटन संकुलाची मुहूर्तमेढ रोवली. या मेगा पर्यटन संकुलात बोटक्लब, ग्रेप पार्क रिसॉर्ट, साहसी क्रीडा केंद्र, कन्व्हेन्शन सेंटर यासह गोवर्धन येथील कलाग्राम प्रकल्पाचा समावेश आहे. पुर्णत्वाकडे असलेल्या या प्रकल्पाचे काम काही दिवसांपासून रखडले होते. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर या प्रकल्पांना पुन्हा एकदा चालना देण्यात आली असून आज पर्यटन दिनाच्या पार्श्वभूमीवर या मेगा पर्यटन संकुलातील 'ग्रेप पार्क रिसॉर्ट'चे राज्याचे मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले आहे.
'ग्रेप पार्क रिसॉर्ट' च्या पहिल्या टप्प्यामध्ये २८ कक्ष तसेच उपहारगृह, सभागृह जलतरण तलाव, सायकल ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, आयुर्वेदिक स्पा व मसाज केंद्र, वाईन टेस्टिंग केंद्र, द्राक्ष महोत्सवाकरिता पायाभूत सुविधा इ. सोयीसुविधा या ठिकाणी पर्यटकांना उपलब्ध होतील. या ठिकाणी अद्यावत स्वरुपात अंतर्गत सजावट, विद्युतीकरण, पाणीपुरवठा, अग्निशामक यंत्रणा व बाह्यपरिसर सुशोभिकरण करण्यात आले आहे. द्राक्ष पर्यटनासह नाशिक वाईन व वायनरीला पर्यटकांमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी सदर 'ग्रेप पार्क रिसॉर्ट'चा (लेक व्ह्यू नेचर्स रिसॉर्ट) उपयोग होणार आहे. नाशिक शहर व जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी हे मेगा पर्यटन संकुल अत्यंत महत्वपूर्ण ठरणार असून या माध्यमातून नाशिकच्या अर्थकारणात मोठी गती मिळणार आहे. या मेगा पर्यटन संकुलात समाविष्ट असलेल्या बोट क्लबच्या डिझाईनचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला. तसेच, परदेशातून नामवंत मासिकांनी याची दखल घेऊन आपल्या पहिल्या पानावर त्याची दखल घेतली.