नाशिक - इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव देवाची वाडी शिवारात दुकानातून आजीसमवेत पायवाटेने घरी जाणाऱ्या सहा वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला चढवला. आजीने जोरदार प्रतिकार केल्याने बिबट्याने शेतात धूम ठोकली. या हल्ल्यात मुलीच्या मानेला गंभीर जखमा झाल्या असून तिला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आजीने वाचवला नातीचा जीव -
बुधवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास खेडभैरव येथील देवाची वाडी शिवारातील पुंडलिक डगळे यांची सहा वर्षाची मुलगी किरण ही नेहमीप्रमाणे मंदिर परिसरातील दुकानातून आजी आणि बहिणी सोबत पायवाटेने घरी जात होती. यादरम्यान शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक किरणवर हल्ला चढवला. सुरुवातीला तिची आजी घाबरली. मात्र, नंतर धाडस करून त्यांनी बिबट्याचा प्रतिकार केला आणि बिबट्याच्या तावडीतून नातीला सोडवले. ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी याबाबत तात्काळ वनविभागाला माहिती दिली. जखमी मुलीला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वन विभागाने लावले पिंजरे -
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वनपाल ढोन्नर, रेश्मा पाठक, पाडवी, सैय्यद, मुनिफ शेख आदींनी परिसरात गस्त घालून बिबट्याचा मागोवा घेतला. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत.