नाशिक - देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील जळीत कांड प्रकरणातील त्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शुक्रवारी (दि.११) दोन दिवसांपूर्वी लोहोणेर येथे ही हृदयद्रावक घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त केले जात आहे.
दिवसाढवळ्या गोरख बच्छाव नामक युवकाला प्रेमप्रकरणातून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यामध्ये हा युवक गंभीर भाजला होता. अखेर रविवारी रात्री अकराच्या सुमारास या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून याप्रकरणी संबंधित मुलीसह ५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोरख काशीनाथ बच्छाव असे पीडित तरुणाचे नाव आहे.
नक्की घटना काय?
याबाबत देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहनेर येथील गोरख काशिनाथ बच्छाव वय ३१ हा युवक रावळगाव येथील युवतीच्या गेल्या तीन वर्षापासून संपर्कात होता. यातून दोघांमध्ये प्रेम प्रकरणाचे संबंध सुरू झाले. त्यानंतर संबंधित युवतीचे लग्न तिच्या घरच्या मंडळींनी आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी करण्याचा निर्णय घेतला.मात्र संबंधितांना तिच्या प्रेम प्रकरणाची माहिती मिळाली असावी असा अंदाज व्यक्त करत तिचा विवाह मोडण्यात आला.याचा राग अनावर होऊन तिच्या घरच्यांनी गोरख बच्छाव यास शिवीगाळ केली. याबाबत त्याने आपला काही संबंध नसून मी आजही ही लग्न करण्यास तयार आहे. असे सांगत राहिल्याने युवतीच्या घरच्यांनी तू लोहनेर येथे थांब आम्ही पंचायत जवळ आलो असे सांगून त्याला बोलावून घेतले.
तिचे आई, वडील, भाऊ यांनी गोरखच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याला जखमी केले आणि संबंधित युवतीने त्याच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिले.यामुळे युवक ५५ टक्के भाजला असून त्यास तातडीने देवळा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तेथून नाशिक येथे हलविण्यात आले. याबाबत देवळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचही आरोपी रावळगाव येथील ताब्यात घेण्यात आले आहे. कल्याणी गोकुळ सोनवणे (वय २३), गोकुळ तोगल सोनवणे (वय ५७), निर्मला सोनवणे (वय ५२), हेमंत सोनवणे (वय ३०) आणि प्रसाद सोनवणे (वय १८) अशी आरोपींची नावे आहेत. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण माधवी कामनी, पोलीस उपविभागीय अधिकारी कळवण अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पो.नि. दिलीप लांडगे पुढील तपास करीत आहेत.