नाशिक - शहरातील सराफा व्यावसायिकांनी आज (२६ फेब्रुवारी) सराफा व्यापारी विजय बिरारी यांच्या मृत्यूप्रकरणी कडकडीत बंद पाळला. तसेच त्यांनी आत्महत्या केली नसून हैदराबाद पोलिसांनी खून केला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी विजय बिरारी यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांचा संशयास्पद मृत्य झाला. बिरारी यांनी आत्महत्या केली नसून हैदराबाद पोलिसांनी नाशिकच्या शासकीय विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरून ढकलून त्यांची हत्या केल्याचा आरोप बिरारी यांचे नातेवाईक आणि सराफा व्यावसायिकांनी केला आहे. आज कडकडीत बंद पाळत त्यांना निषेध व्यक्त केला. तसेच हैदराबाद पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत बंद सुरूच राहणार असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
आज दुपारी तीन वाजेपर्यंत हैदराबाद पोलिसांवर गुन्हा दाखल केला नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील सराफ व्यावसायिकांनी दिला आहे. यापूर्वी देखील हैदराबाद पोलीस तसेच इतर राज्यातील पोलिसांनी चोरीचे सोनं विकत घेतल्याप्रकरणी नाशिकच्या सराफ व्यावसायिकांना त्रास दिल्याचे तसेच पैशाची मागणी करत असल्याचे सराफ व्यावसायिकांनी म्हटले आहे.