नाशिक - जिल्ह्यातील येवला तालुक्यातील देवळाणे येथे रात्री ३ वाजण्याच्या सुमारास देवळाणे-तिळवणी रोडवरील रेशन दुकानासह एका गोडाऊनला आग लागल्याची घटना घडली. यामध्ये लग्न समारंभात वापरले जाणाऱ्या मंडपाचे सर्व साहित्य जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
देवळाणे-तिळवणी रोडवरीर रेशन दुकान आणि एका गोडाऊनला आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच सरपंचांनी अग्निशमन दलाला बोलावून आग आटोक्यात आणली. यामध्ये मंडप व्यवसायाचे साठवलेले सर्व साहित्य, डिझेल व पेट्रोल, जनरेटर, ८० साईट पडदे, साउंड सिस्टीम, ५० गाद्या, ५० चटई, प्लास्टिक, ताडपत्र्या, दोन महाराजा खुर्च्या, दुकानाच्या शटरसह छताचे पत्रे आदी साहित जळून खाक झाले. आग लवकर आटोक्यात आल्याने गावातील इतर घरे, जनावरांचा चारा सुदैवाने वाचला. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.