नाशिक - शहरात वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि पेट्रोल, डिझेलचे वाढते भाव बघता नाशकात तीन महिलांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी शहरात पहिली 'गो ग्रीन' इलेक्ट्रिक कॅब सेवा सुरू केली आहे. (go green electric cab service in nashik) या वाहनाचे भाडे इतर वाहनांपेक्षा किमान 25 टक्के कमी असेल. विशेष म्हणजे यात महिला चालकांना प्राध्यान्य राहणार आहे. तसेच बुकिंगही ॲपद्वारे करता येणार आहे. ग्राहकांना प्रत्यक्षात ही सेवा 10 डिसेंबरपासून मिळणार आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (minister chhagan bhujbal) यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन भुजबळ फार्म येथे करण्यात आले.
जगभरात प्रदूषण वाढत असल्याने जगात सगळीकडे प्रचार प्रसार सुरू आहे. इलेक्ट्रॉनिकसह इतर प्रदूषण विरहीत वाहनांना पसंती देण्यात येत आहे. नाशिकमध्येही पहिल्यांदाच ‘गो ग्रीन’ उपक्रम सुरू होत आहे. नाशिकमध्ये इतर ठिकाणांच्या तुलनेत प्रदूषण कमी असून नाशिकचे वातावरण अधिक चांगले आहे. नाशिक शहर अधिक स्वच्छ, सुंदर व प्रदूषण मुक्त कस राहील यासाठी महिलांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वांनी कौतुक केले.
हेही वाचा - साहित्य संमेलनातून मराठी भाषेच्या समृद्धीचा जागर करणार - छगन भुजबळ
प्रदूषण विरहित वाहनाचा वापर करा -
जगात सगळीकडे होणारे प्रदूषण हे कारखान्यापेक्षा जास्त वाहनांतून होते. त्यामुळे संपूर्ण जग हो ‘ग्लोबल वॉर्मिंग’ला सामोरे जात आहे. त्याचे अनेक दुष्परिणाम निसर्गातील प्रत्येक घटकाला सोसावे लागत आहे. यातून बचाव करण्यासाठी आपल्याला प्रदूषण विरहित वाहनांचा वापर करण्याची आवश्यकता असून नागरिकांनी जास्तीत जास्त प्रदूषण विरहित वाहने वापरण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
इलेक्ट्रिक कॅब्स काळाची गरज -
यावेळी ‘गो ग्रीन’चे संचालक हिना शहा, रुची भाटिया, श्रद्धा मढय्या यांनी इलेक्ट्रिक कॅब्स सर्विसेस च्या माध्यमातून गो ग्रीन ही संकल्पना राबविण्यात येत आहे. ज्याचा उद्देश, नाशिककरांना पर्यावरणापूरक, आणि निसर्गाशी जोडू पाहणारे आयुष्य देणे, हाच होता. नाशिकमध्ये वाढत्या वाहनांच्या प्रदूषणावर तोडगा काढणे, हे या संकल्पनेमधील पहिले पाऊल होते. त्याचीच प्रचिती म्हणून इलेक्ट्रिक कॅब्स ही संकल्पना उदयास येऊन ती त्यांनी प्रत्यक्षात आणली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
नाशिकचे दिल्ली होऊ नये -
पर्यावरणाच्या रक्षणासाठी अशा प्रकारचे उपक्रम सुरू होण्याची आवश्यकता आहे. शहराला नाशिक शहराचे दिल्ली होऊ नये, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. पर्यावरणपूरक वाहने वापरण्यास नाशिक महानगरपालिकेकडूनही करण्यात येत आहे. नाशिककरांनीही प्रदूषण विरहित वाहनांचा वापर करावा, असे आवाहन महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले आहे.