नाशिक - लॉटरी लागल्याचे सांगून महाराष्ट्र पोलीस अकादमीतील महिला प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकाला ६० हजार रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसापूर्वी संशयीत अनंत कुमार गुप्ता याने मोबाईलवर वेळोवेळी फोन करत तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगितले. बक्षिसाची रक्कम मिळण्यासाठी जीएसटी आणि इतर प्रोसेससाठी काही रक्कम ऑनलाईन भरावी लागेल असे सांगितले. संशयिताच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने महिला उपनिरीक्षक यांनी पैसे भरण्याची तयारी दाखवली. यानंतर या महिलेने वेगवेगळ्या बँक खात्यावर ६१ हजार रुपये भरले. बरेच दिवस होऊनही लॉटरीची रक्कम बँकेत जमा न झाल्याने संशयिताला फोन केला. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत आणखी पैसे भरण्यास सांगितले.
संशय आल्याने त्याबाबत माहिती घेतली असता संशयिताचे सर्व नंबर बंद केल्याचे समजले. याबाबत महिला प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकेने अकादमीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यावरून गंगापूर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने ऑनलाईन गुन्हेगारीने थेट पोलीस अकादमीत शिरकाव करून सायबर क्राईम तसेच विविध कायदा आणि गुन्ह्यांचे प्रशिक्षण घेणाऱ्या महिला अधिकाऱ्याला गंडा घातला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.