नाशिक : जिल्ह्याच्या मनमाड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, महावितरण कंपनी, उपजिल्हा रुग्णालयापाठोपाठ आता मनमाड नगरपालिकेत देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आज(बुधवार) सकाळी पालिकेच्या चार अधिकाऱ्यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण पालिका सीलबंद करण्यात आली असून पालिकेचे कामकाज ठप्प झाले आहे.
मनमाड शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असुन सामूहिक संसर्ग वाढत आहे. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, महावितरण कंपनी, उपजिल्हा रुग्णालयापाठोपाठ आता नगर पालिकेतील चार अधिकऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल प्राप्त होताच सर्वांचे धाबे दणाणले आहे. यानंतर, पालिकेच्या संपूर्ण इमारतीला सॅनिटाईझ करण्यात आले असून संपूर्ण कामकाज बंद करण्यात आले आहे.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याने कोरोना प्रतिबंध करण्यासाठी लागणारे सर्वचजण आज सक्तीच्या रजेवर गेले. त्यामुळे पालिकेचे कामकाज ठप्प पडले आहे. तर, गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेला मुख्याधिकारी नव्हते. आज पालिकेत विजय मुंडे यांची नियुक्ती झाली असुन हातात सूत्र घेतल्या-घेतल्या त्यांना कोरोनाचा सामना करावा लागणार आहे. तर दुसरीकडे सामूहिक संसर्ग रोखण्यासाठी पालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.