सटाणा ( नाशिक)- जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. बागलाण तालुक्यात 4 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 6 झाला आहे. या पार्श्वभूमीवर यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. कोरोनाबाधितांच्या निवासस्थानापासून ३०० मीटरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. बाधितांची संख्या वाढू लागल्याने प्रशासन चांगलेच हादरले आहे
मुंबईतील घाटकोपर येथील महिला तालुक्यातील वरचे टेंभे येथील नातेवाईकांकडे आली होती. या महिलेची तब्बेत बिघडल्याने येथून ती देवळा तालुक्यातील वासोळपाडे येथे माहेरी गेली होती. दरम्यान तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यानंतर तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. महिलेच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले होते. यापैकी 2 व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. यात पन्नास वर्षीय महिला व दहा वर्षीय मुलाचा समावेश आहे. तर इतर १० संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोरोनाबाधित महिलेच्या अंत्यविधीस गेलेल्या वरचे टेंभे गावातील 14 नातेवाईकांनाही क्वांरटाइन करण्यात आले आहे. अंत्यविधीला जाताना 14 नातेवाईकांनी एकाच वाहनातून प्रवास केला. याकडे प्रशासनाचेही अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले. या व्यक्तींचे वैद्यकीय तपासणी अहवाल काय येतात, याकडे प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे.
सटाणा नगरपरिषद हद्दीतील एका जोडप्याला कोरोना सदृश लक्षणे आढळल्याने त्यांना क्वांरटाईन करण्यात आले होते. आज त्यांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बागलाण तालुक्याची चिंता वाढली आहे. तालुक्यात एकाचवेळी 4 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.त्यामुळे तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 6 वर पोहोचली आहे.
वाढणाऱ्या रुग्णसंख्येचे गांभीर्य लक्षात घेता आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहेत.