नाशिक - कार्यक्रमावरुन घरी परतताना कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चार मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री पुणे-इंदूर महामार्गावर अनकवाडे परिसरात घडली. या घटनेत तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे या चार जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर अजय वानखेडे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कार्यक्रमावरुन येवल्याकडे परत येताना काळाचा घाला - तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे आणि अजय वानखेडे हे पाच मित्र एका कार्यक्रमावरुन येवल्याकडे परत येत होते. पुणे-इंदूर महामार्गावर अनकवाडे परिसरात गाडी येताच भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. प्रचंड वेगात गाडी असल्याने झाडावर गाडी आदळताच गाडीचा चक्काचूर झाला. यातील तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे या चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर अजय वानखेडे हा गंभीर जखमी असून त्याला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर पुणे इंदूर महामार्ग झाला ठप्प - गाडीचा अपघात झाल्यानंतर चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली. त्यामुळे पुणे - इंदूर महामार्ग ठप्प झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या घटनेने मनमाड शहरात शोककळा पसरली आहे.
जीवलग मित्रांवर होणार एकाचवेळी अंत्यसंस्कार...! - या अपघातात ठार झालेले चारही जण एकमेकांचे जीवलग मित्र होते. मात्र या चारही जणांवर काळाने घाला घातला. अपघातात ठार झालेल्या या मित्रांपैकी तिघांवर एकाचवेळी अमरधाममध्ये, तर एकावर कब्रस्थानात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जीवलग मित्रांचा एकाच घटनेत असा अंत झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.