नाशिक- मालेगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार असिफ रशीद शेख यांनी पक्षच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्याकडे राजीनाम्याचे पत्र पाठवले. शेख यांच्या राजीनाम्यामुळे मालेगावात काँग्रेस पक्षला भगदाड पडले आहे. माझ्या खाजगी कारणांमुळे पक्षला वेळ देऊ शकत नसल्याचे शेख यांनी आपल्या राजीनाम्याचा पत्रात म्हटले असले तरी शेख असिफ शेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
१५ दिवसानंतर अंतिम निर्णय
असिफ शेख यांच्या सोडचिठ्ठीनंतर त्यांचे कार्यकर्तेही राजानामा देणार आहेत. कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून पुढची दिशा ठरवण्यात येईल. तसेच कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याचा निर्णय जनतेच्या भावनांचा विचार करून घेण्यात येईल. येत्या १५ दिवसानंतर अंतिम निर्णय घेणार असल्याचे शेख यांनी स्पष्ट केले.
कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय जनता घेईल.
मी आजपर्यंत काँग्रेस पक्षात राहून नागरिकांसाठी मनापासून काम केले. मात्र, आज मी माझ्या खाजगी कारणामुळे काँग्रेस पक्षचा राजीनामा दिला आहे. पुढील काही दिवस मालेगावमधील प्रभागामध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहे. जनतेशी संवाद साधून कोणत्या पक्षात प्रवेश करायचा याबाबत निर्णय घेणार असल्याचेही शेख म्हणाले.