नाशिक - हे कश्मीर नाही, तर नाशिक आहे, असं म्हणण्याची वेळ आली आहे. शहरावर सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. रस्ते देखील धुकेमय झाल्यामुळे वाहन चालवताना चालकांना अडचणी येत आहेत. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नियमित मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांपेक्षा अधिक प्रमाणात नागरिक रस्त्यावर दिसून येत आहेत.
आज सकाळी नाशिक शहर धुक्यात गुडूप झाले होते. संपूर्ण शहरावर धुक्याची पांढरी चादर पसरली होती. या गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नाशिककर मोठ्या प्रमाणात बाहेर पडले होते. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सतत वातावरणात बदल जाणवत आहे. धुके आणि थंडीमुळे द्राक्ष मान्यांना तडे जाण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.
द्राक्ष पिकांसोबत इतर पिके अडचणीत -
नाशिक जिल्हा कांद्याबरोबरच सर्वधिक द्राक्ष उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. देशात सर्वाधिक द्राक्षाचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात घेतले जाते. भारतासह अनेक देशात येथील द्राक्ष निर्यात होत असतात. गेल्या चार दिवसांपासून तापमानाचा पारा घसरत चालल्याने द्राक्ष उत्पादक धास्तावला आहे. जास्त थंडीमुळे निर्यातक्षम द्राक्षाची पत मिळणे अवघड होते तसेच अति थंडीमुळे औषध फवारणीचा खर्च देखील दुप्पट होतो. यासोबतच धुके आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा, गहू, मका आणि भाजीपाला या पिकांचेही नुकसान होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - दिंडोरीत मध्यम स्वरुपाचा पाऊस; द्राक्ष उत्पादक धास्तावले