नाशिक - महापालिकेच्यावतीने ३ दिवसीय पुष्पोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध जातीच्या मनमोहक, सुगंधी फुला सोबतच पुष्प रचना आणि कुंड्यांची आकर्षक रचना मांडण्यात आली आहे. त्यामुळे निसर्गप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.
नाशिक महानगरपालिकेत गेल्या ९ वर्षांपासून पुष्पोत्सव खंडित झाला होता. मात्र, यंदा महापौर रंजना भानासी आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या प्रयत्नातून पुष्पोत्सव भरवण्यात आला आहे. यामध्ये मर्दानी गुलाब राजा, लाजरी गुलाब राणी, गुलाब राज, गुलाब राजकन्या यासोबत शहरातील उद्यानाची प्रतिकृती, रांगोळी, फुलांचा आकर्षक सेल्फी पॉईंट यामुळे निसर्ग प्रेमी या वातावरणाच्या प्रेमात पडलेले दिसून आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मराठी अभिनेत्री अनिता दातेच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर गुलाब राजा, गुलाब राणी आणि विविध विभागामध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या पुष्पोत्सवात झेंडू, गुलाब, फ्लॉक्स, पियुनिया, जर्बेरा, शेवंती, डेलिया, निशिगंधा, कारणेशन आदी विविध फुल नागरिकांचे आकर्षण ठरत आहे.
हरित नाशिकच्या दृष्टीने सध्या शहरात ६ ठिकाणी देवराई सुरू करण्यात आली असून शहरात लवकरच ३१ ठिकाणी अशा प्रकारे देवराई साकारण्यात येणार असल्याचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.
पुष्पोत्सवानिमित्त महानगरपालिकेच्या परिसरात १ हजार ११२ कुंड्यांच्या शोभिवंत फुलांच्या ३० फुटी मनोरा उभारण्यात आला आहे. या मनोऱ्याच्या माध्यमातून काश्मीर मधील पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. फुलांचा मनोरा या पुष्पोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरत आहे. २ लाखांहून अधिक नागरिक या पुष्पोत्सवाल भेट देतील असा अंदाज आयोजकांनी वर्तवला आहे.