सटाणा(नाशिक)- मालेगावच्या संपर्कामुळे बागलाण तालुक्यात पाच गावांकडे हॉटस्पॉट म्हणून पाहिले जात आहे. संचारबंदी लागू असतानाही पोलीस यंत्रणेची नजर चुकवून लॉकडाऊन काळात सटाणा शहरासह अंतापूर, नामपूर, जायखेडा, ताहाराबाद येथे मालेगावहून अनेक जण येत असल्याची चर्चा आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून मालेगावात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने मालेगावातील बहुतांश रहिवाशी ग्रामीण रस्त्यांचा शोध घेऊन नातेवाईकांचा आश्रय घेतल्याची शक्यता आहे. त्यामुळे शेकडो लोक संपर्कात आल्याने या पाच गावांकडे आजतरी हॉटस्पॉट म्हणून पहिले जात आहे
सटाणा शहरात न्हावीगल्ली, पाटोळे गल्ली, पुंडलिकनगर येथे दहा जणांना विलगीकरणचा शिक्का मारला असतांनाही हे दहा जण नियमांचे पालन न करता राजरोसपणे शहरातून फिरत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. मालेगाव शहरात कोरोना बाधितांची संख्या ही बागलाणसाठी धोक्याची घंटा आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बागलाणवासियांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करणे व सतर्क राहणे आवश्यक आहे.
नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये तसेच बाहेरच्या नागरिकाच्या संपर्कात येऊ नये, बाहेरगावच्या पाहुण्यांना देखील कोणीही आश्रय देऊ नये, हा लॉकडाऊनच्या काळात गुन्हा आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने कोरोनाचा शिरकाव रोखाण्यासाठी तत्पर राहावे, असे मत बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी व्यक्त केले.