नाशिक Fire Incidents In Nashik: मुख्य बाजारपेठ असलेल्या एमजी रोड परिसरात काल (रविवारी) मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत चार ते पाच दुकानं जळून खाक झाली. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. आग कशामुळे लागली याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. तरी फटाक्यामुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
कोट्यवधी रुपयांचं साहित्य जळून खाक : नाशिकची मुख्य बाजारपेठ म्हणून एमजी रोड, मेनरोडचा भाग ओळखला जातो. या ठिकाणी नानाविध प्रकारची दुकानं असून सण उत्सवात येथे नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत असते. अशात काल मध्यरात्री एमजी रोड भागातील दुकानाला आग लागली. नागरिकांनी ही माहिती अग्निशामक विभागाला दिली; मात्र तोपर्यंत आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं. या आगीत आजूबाजूची चार ते पाच दुकानं जळून खाक झाली. सर्व दुकानात दिवाळीचं साहित्य उपलब्ध असल्यानं अनेक दुकानातील कोट्यवधी रुपये किमतीचं साहित्य जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवळपास 10 ते 12 बंब तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. दिवाळीच्या फटाक्यांमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप मात्र नेमकं कारणं कळू शकलेलं नाही.
दोन तासात सहा घटना : याच दरम्यान शहरातील द्वारका काठे गल्ली येथे एका कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. यानंतर पद्मा ट्रेडर्स, दिंडोरी रोड पंचवटी येथे पुठ्ठ्याच्या ढिगाऱ्यावर फटाका पडल्याने आग लागली. अशोका मार्ग येथे रॉयल टॉवर येथील बंद सदनिकेत फटाका शिरल्यानं आग लागली. केली मदिना चौकात पत्राच्या शेडवर फटाका पडल्यानं साहित्यानं पेट घेतला होता. रविवारी कारंजा येथे दगडू तेली चांदवडकर दुकानाबाहेर असलेला मंडप फटाक्यामुळे पेटला होता. या घटना एकापाठोपाठ एक घडल्यानं अग्निशामक दलाची धावपळ उडाली.
लाखो रुपयांच्या पैठणी साड्या जळून खाक : पैठणी साडीसाठी प्रसिद्ध असलेल्या येवला नगरामध्ये दिवाळीच्या दिवशी एका पैठणी साडीच्या दुकानाला भीषण आग लागली. शहरातील फत्तेपुर नाका परिसरात छत्रपती संभाजी नगरकडे जाणाऱ्या राज्य महामार्ग रस्त्यावरील हे पैठणी साडी विक्रीचं नाकोड फॅशन दुकान आहे. या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत लाखो रुपयांच्या साड्या जळून खाक झाल्या आहेत.
हेही वाचा: