नाशिक - शहरातील गंजमाळ परिसरातल्या भिमवाडी झोपडपट्टीत आज (शनिवारी) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत 20 ते 25 पत्र्याची घरे जळून खाक झाली. तर अनेक घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
गंजमाळ परिसरातील भिमवाडी झोपडपट्टीत आज (शनिवारी) सकाळी एका घराने अचानक पेट घेतला. आगीने क्षणात रौद्ररूप धारण केल्याने आजबाजूची घरे देखील पेटली. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या शेजारील महापालिका उर्दू शाळेच्या मागील बाजुस असलेल्या घरांनी पेट घेतला. घरातील गॅसचे सिलिंडरांचे स्फोट झाल्याने गोंधळात भर पडली. या भिमवाडी परिसरात अतिशय दाटीवाटीचा रस्ता आहे. यामुळे आग वेगात वाढली. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, आग विझवताना अग्निशामक दलाचे जगदीश देशमुख हे जखमी झाले. झोपडपट्टी परिसर असल्याने आग विझवण्यास अडचणी आल्या.
घटनास्थळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, मनपा आयुक्त राधाकुष्ण गरमे, खासदार हेमत गोडसे यांनी पाहणी केली. नागरिकांची तात्पूरती व्यवस्था बीडी भालेकर हायस्कुल, मनपा उर्दु हायस्कुल येथे जेवण आणि निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. तर या आगीत जवळपास शंभर घरांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर ज्यांची घरे जळाली त्या पीडितांची तात्पुरता निवारा राहण्याची तसच जेवणाची व्यवस्था ही नाशिक महानगरपालिकेच्या मनपा शाळेत केली आहे. घटनेचा पंचनामा करून जिल्हाधिकारीशी बोलून पुढील मदतीसाठी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.