नांदगाव - येथील वन विभागाच्या वन क्षेत्रातील जंगलात रात्री वणवा पेटला. या आगीत शेकडो एकरावरील झाडे-झुडपे जळून खाक झाली असून यामध्ये वन्य पशु-पक्ष्यांची मोठी हानी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या आगीचे कारण अजूनही अस्पष्ट असले तरी कोणीतरी खोडसाळपणा केला असल्याचे प्राथमिक अंदाजात बोलले जात आहे.
नांदगाव शहरालगत मालेगाव-औरंगाबाद महामार्गावरील असलेल्या वन विभागाच्या जंगलात अचानकपणे वणवा पेटल्याची घटना रात्री घडली. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिक व तरुणांनी घटनास्थळी धाव घेत स्वतःचा जीव धोक्यात घालून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जंगलात वाळलेले गवत मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने काही क्षणात रौद्ररूप धारण केल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपी जळून खाक झाली. जंगलात हरिण, काळवीट, मोर, ससे यासह इतर पशु-पक्षी मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची देखील मोठी हानी झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नांदगाव व मनमाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन सुमारे 5 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत मोठी हानी झालेली होती. आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट असून कोणीतरी खोडसाळपणा करून पेटती विडी, सिगारेट फेकली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नांदगांव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. या ठिकाणी अनेक प्राणी देखील आहेत. याकडे शासनाने लक्ष देऊन या भागाचा विकास करत जंगली प्राण्यांना संरक्षित करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
नांदगाव वनविभागाकडे सरकारचे दुर्लक्ष..!
नांदगाव तालुक्यातील व येवला तालुक्यातील मिळून मोठ्या प्रमाणावर वनविभागाचे जंगल आहे. यात ससे, हरीण, काळवीट, लांडगे, मोर यासारखे प्राणीदेखील आहेत. मात्र, हा भाग अजूनही सरकारी स्तरावर दुर्लक्षित असून या वन्यप्राण्यांना उन्हाळ्यात अन्न-पाणी सामाजिक संस्थेच्या वतीनेच करण्यात येत आहे. तसेच हा भाग चांगला विकसित केला तर मोठे पर्यटन स्थळ देखील होऊ शकते. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.