नाशिक - सप्तश्रृंगी मातेच्या गडावर जाणाऱ्या घाटात अपघात झाल्याचे खोटे फोटो व्हायलर करणाऱ्या तरुणाविरुद्ध कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन कुंडलीक महाले, असे त्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा - गंगापूर रस्त्यावर कार पुलावरून खाली कोसळली; दोन तरुणांचा जागीच मृत्यू
सप्तश्रृंगी गडावरील पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सप्तश्रृंगी गडावर अपघात झाल्याचे फोटो सप्तश्रृंगी गड परिसराचा नामोल्लेख करून सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यामुळे सप्तश्रृंगी मातेच्या भाविक व नागरिकांमध्ये या घटनेबद्दल गैरसमज झाला होता. त्यामुळे भाविकांकडून गडावरील ग्रामस्थ, स्थानिक पोलीस, सप्तश्रृंगी देवी ट्रस्ट, बसडेपो व परिसरातील तसेच वणी गावातील नागरिकांना अपघाताबाबत विचारणा केली जात होती. त्यामुळे सर्व घटकांना होणारा त्रास लक्षात घेता, पोलिसांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर फोटो व्हायरल करणाऱ्या तरुणाच्या मोबाईल क्रमाकांचा शोध घेतला. तसेच त्या तरुणाविरोधात कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक योगेश गवळी करत आहेत.