नाशिक - शालेय साहित्यांसाठी पैसे मागितले म्हणून जन्मदात्या बापाने स्वत:च्या दोन मुलांना विष पाजल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नाशिकच्या शिंदे पळसे गावातील ही घटना आहे. निकिता आणि ऋषिकेष अशी दोन्ही मुलांची नावे आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पंढरीनाथ बोराडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मुलांवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
महाविद्यालय सुरू होऊन महिना उलटला तरीही निकिता वह्या, पुस्तकांशिवाय महाविद्यालयात जात होती. निकिताच्या मैत्रिणी तिला तु पुस्तके का आणत नाही म्हणून रोज विचारत होत्या. निकीता दररोज वह्या-पुस्तकांसाठी वडिलांकडे तगादा लावत होती. आज तरी आणले का, उद्या तरी घेऊन देणार का? म्हणून तिने शुक्रवारी वडिलांना हट्टाने मला एक हजार रुपये द्या असे बजावले. त्याचा पंढरीनाथ बोराडेला राग आला. बोराडे नशेत होता. त्याने मुलीला लाथा बुक्क्यांनी मारले. मुलगी जिवाच्या आकांताने ओरडत होती. पंढरीनाथ तिला मारतच होता. एवढ्याने त्याचे समाधान झाले नाही म्हणून की काय तो थेट घराबाहेरील गोठ्यात गेला. तेथून त्याने रोगर किटकनाशकाची भरलेली बाटली आणली. निकिताच्या तोंडात बळजबरीने ते औषध ओतू लागला. यावेळी घरात मुलांची आई नव्हती. आरडाओरड ऐकून ती आली. तिनेही आरडाओरड सुरू केली. एव्हाना ऋषिकेषही निकिताच्या मदतीला आला. ऋषिकेष व निकिताने मिळून पित्याचा प्रयत्न हाणून पाडला. पण तोपर्यंत दोन्ही मुलांच्या शरिरात विष गेले होते. एव्हाना शेजारीही जमले होते. तेव्हा कुठे पंढरीनाथ आटोक्यात आला. ऋषिकेषने नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यानंतर दोन्ही मुलांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यापैकी ऋषिकेषची प्रकृती स्थिर असून निकिताची प्रकृती गंभीर आहे.