नाशिक - द्राक्ष पंढरी समजल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील शेतकरी कोरोनामुळे संकटात सापडला आहे. संचारबंदीमुळे द्राक्षांना मागणी नाही. त्यामुळे द्राक्ष वेलीवर आहेत. शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांवर कुर्हाड चालवायला सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांवर वर्षभर काम करणारे मजूर व्यवसायिक अवलंबून असतात. शेतकऱ्यां पाठोपाठ मजूरवर्ग व्यापारी या सर्वांचे देखील हाल होणार आहे. दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील प्रगतशील द्राक्ष उत्पादक नामदेव रामचंद्र पाटील यांच्या परिवाराने तर आपल्या सहा एकर द्राक्षबागेवर कुऱ्हाड चालवून द्राक्ष बाग तोडल्याची घटना समोर आली आहे.
मोहाडी (ता. दिंडोरी) येथील रमेश पाटील व सुनील पाटील यांना मोठ्या अपेक्षेने लावलेल्या द्राक्षबाग तोडताना अश्रू अनावर झाले. कोरोनामुळे बागा तोडण्यासाठी मजूरही मिळेनासे झाल्याने त्यांनी आपल्या कुटुंबाला सोबत घेऊन द्राक्षबागांवर कुऱ्हाडीचा घाव घातला. सरकारने शेतकर्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी ठोस उपाययोजना राबवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - राजस्थान येथून महाराष्ट्रात येणाऱ्या दाम्पत्याचा अपघात; उपचारानंतर नाशिकमध्ये विलगीकरण