येवला ( नाशिक ) : येवल्यात 20 दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाने आज दमदार हजेरी लावली. तालुक्यातील शेतकरी ज्या पावसाची प्रतीक्षा करत होता तो पाऊस जोरदार पडल्याने बळीराजाने पेरलेल्या खरिपाच्या पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे. तरीदेखील अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.
अचानक आलेल्या जोरदार पाऊसामुळे तालुक्यातील अंदरसुल कांदा मार्केटमध्ये लिलावसाठी आलेल्या ट्रॅक्टर मधील कांदा झाकण्यास शेतकऱ्यांची धावपळ झाली. तर शेकडो ट्रॅक्टरमधील कांदा पाऊसाने भिजला आहे. अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती लिलावासाठी आलेला कांदा सकाळच्या सत्रात ६०० ट्रक्टरचा लिलाव होऊनही प्रचंड आवक असल्याने दुपारचे सत्र नसताना पण शेतकऱ्यांनी गर्दी केली म्हणून बाजार समिती प्रशासनाने व्यापारी बांधवांना आवाहन केल्याने दुपारी ४ वाजता लिलावात व्यापारी सहभागी होणार होते.
परंतु अचानक पाऊस आलेल्या पाऊसने बाजार समितीत आवारात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरमधील कांदा हा भिजला गेला आहे. तर काही शेतकऱ्यांनी ताडपत्री आणलेली होती, त्यांनी त्वरित कांद्यावर टाकली. तसेच पिंपळगाव जलाल येथे पाऊसाची जोरदार हजेरी लावल्याने शेतात पाणीच पाणी झाले होते.