येवला (नाशिक)- येवला तालुक्यातील अंदरसुल गावातील तरुण शेतकरी आदित्य जाधव याने टोमॅटोला भाव मिळत नसल्याने संतप्त होत रस्त्यावर टोमॅटो फेकून दिले. या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोचे पीक घेतले होते. टोमॅटो निघण्यास सुरुवात झाली, सुरुवातीला भाव मिळाला. बाजारात टोमॅटोच्या एका कॅरेटला पंचवीस रुपये दर मिळाल्याने शेतकीर संतप्त झाले आहेत. टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांचा वाहतूक खर्चही निघत नव्हता. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचा संतप्त अवतार यावेळी बाजारात पाहायला मिळाला. या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याने मनमाड- शिर्डी महामार्गावर विंचूर चौफुली येथे टोमॅटो फेकत लाल चिखल करून आपला संताप व्यक्त केला.
टोमॅटोची मोठी आवक होत असल्याने टमाटो उत्पादनाच्या तुलनेत देशांतर्गत मागणी होत नाही. तसेच गेल्या तीन वर्षांपासून पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने त्याचा थेट परिणाम टोमॅटोच्या दरात होताना दिसत आहे. येवला बाजार समिती टोमॅटोच्या 20 किलोच्या क्रेटला 25 ते 30 रुपयापर्यंत म्हणजे एक रुपया किलो बाजार भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त होत आहेत. त्यामुळे येवल्यातील रस्त्याच्या कडेला ठराविक ठिकाणी अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या स्वप्ने या टोमॅटोच्या लाल चिखलात पाहायला मिळत आहेत.