नाशिक - कोरोना या विषाणूजन्य रोगाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. याचा सर्व उद्योगधंद्यावर परिणाम झालेला आहे. कोरोनामुळे शेती व्यवसायाची साखळी पण तुटली आहे. दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथील पांडुरंग निवृत्ती गडकरी यांच्या फुलशेतीला कोरोनाचा फटका बसला. त्यामुळे त्यांनी फुलशेतीवर नांगर फिरवून लाखो रुपये खर्च केलेल्या पॉली हाउसचा वापर रोपवाटीका तयार करण्यासाठी केला. त्यातून दिंडोरी, निफाड, नाशिक, चांदवड तालुक्यातील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी सुद्धा रोपे उपलब्ध करून देणार असल्याचे पाडूंरंग गडकरी यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले.
पांडुरंग गडकरी यांनी २०११ व २०१२ मध्ये सुरुवातीला सव्वा एकरात पॉलीहाऊसमध्ये फुलशेतीला सुरुवात केली. त्यावेळी फुलाची मागणी वाढल्यामुळे त्यांनी पुन्हा सव्वा एकरमध्ये पॉलीहाऊस उभारून फुलशेतीचे अडीच एकरात उत्पन्न घेण्यास सुरवात केली. त्यावेळी त्यांना साधारण पन्नास लाखापर्यंत खर्च आला होता.
या पॉली हाऊसमध्ये त्यांनी गुलाब जातीच्या दोन प्रकारचे गुलाब फुलाचे पीक घेतले. त्यात बोल्डेज, टॉप सिक्रेटे, यामुळे साधारण उत्पन्न तीस ते चाळीस लाखापर्यंत उत्पन्न मिळत होते. त्यात बँक हप्ते जाऊन दहा लाख, शिल्लक राहत होते. परंतु नोटाबंदीपासून पॉली हाऊस फुलशेतीला उतरती कळा लागली. यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे शेतकऱ्यांचा शेतीचा कणा मोडून पडला असून त्यातून सावरण्यासाठी मी फूल शेतीचे रुपांतर रोपवाटीकेत केल्याचे पांडुरंग गडकरी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.