नाशिक - कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन बरोबरच विविध खबरदारीचे उपाय अवलंबीले जात आहेत. यामुळे काही सामाजिक बदल स्विकारणे क्रमप्राप्त झाले आहे. संचारबंदीमुळे मोठे लग्न करण्यास बंदी असल्याने साधेपणाने छोटेखानी विवाह उरकून घेतले जात आहेत. सटाणा येथील युवा नगरसेवकाने मंगळवारी फेसबुक लाईव्हद्वारे आपला विवाह अनोख्या पद्धतीने साजरा केला. विशेष म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून तब्बल पंचावन्न हजार पाहुणे व मित्रमंडळींनी जेथे आहे तेथून ऑनलाइन राहून हा विवाह सोहळा पाहिला आणि वधू-वरास शुभेच्छाही दिल्या.
तब्बल 55 हजार पाहुण्यांच्या पडल्या डोक्यावर अक्षता -
सटाणा पालिकेतील निवृत्त वसूली निरीक्षक सुभाष पाटील यांचे चिरंजीव युवा नगरसेवक व कोंग्रेसचे नाशिक जिल्हा युवक कार्याध्यक्ष राहुल पाटील आणि धांद्री (ता.बागलाण) येथील ग्रामसेवक विनायक सूर्यवंशी यांची कन्या हर्षदा सूर्यवंशी यांचा गेल्या दोन महिन्यांपूर्वी विवाह ठरला होता. मात्र मार्च महिन्यात कोरोनाचे संक्रमण सुरू झाल्याने देशात सर्वत्र लॉकडाऊन झाले. त्यामुळे विवाह सोहळा लांबणीवर पडला. नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक वेगाने होऊ लागल्याने दोन्ही कुटुंबियांनी विवाह सोहळा लवकरात लवकर पार पाडण्याचे ठरविले. यावर विचार सुरू असतानाच राहुल पाटील यांना फेसबुक लाईव्हची संकल्पना सुचली.
दोन्हीकडील नातेवाईकांनी पाहुणे आणि सर्व मित्रमंडळींना फेसबुक लाईव्हची कल्पना देऊन ऑनलाइन राहण्यास सांगितले. त्यानंतर अवघ्या २४ कुटुंबियांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी मंत्रोच्चारांत हा अनोखा विवाह पार पडला. पाहुणे आणि मित्रमंडळी असे मिळून जवळपास साठ हजार व्यक्तींनी हा विवाह सोहळा जेथे आहे तेथे ऑनलाइन राहून बघितला आणि वधूवरांना शुभाशिर्वादही दिले तर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.
आगळ्यावेगळ्या विवाहाची सर्वत्र जोरदार चर्चा -
दरम्यान, विवाह सोहळ्याआधी साखरपुडा संपन्न झाला. वधू हर्षदा ही औषधनिर्माण शाखेतील उच्चशिक्षित आहे. कोरोना विरुद्धच्या लढ्यात अनेक डॉक्टर, नर्सेस, आरोग्य, स्वच्छता कर्मचारी आणि पोलिस बांधवांना संसर्ग झाला असून काहींना त्यात जीवही गमवावा लागला आहे. साखरपुड्यावेळी हर्षदाने ऍप्रॉन तर वर राहुलने खाकी रंगाचा शर्ट आणि मास्क परिधान करून त्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली. या विवाह सोहळ्यासाठी पाटील आणि सूर्यवंशी परिवाराने आहेर स्वरुपात रक्कम न स्वीकारता ‘आपण घरीच राहा, सुरक्षित रहा’ हाच आमचा आहेर आहे, असा संदेशही दिला. या आगळ्यावेगळ्या विवाहाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.
मान्यवरांनी ऑनलाईन विवाहसोहळा बघून दिल्या शुभेच्छा -
महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, आमदार सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, आमदार कुणाल पाटील, महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार राहुल आहेर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, जिल्हा परिषद सदस्य पप्पूतात्या बच्छाव, युवानेते अजय दराडे, नगराध्यक्ष सुनील मोरे यांसह अनेक मान्यवरांनी फेसबुकद्वारे ऑनलाईन विवाहसोहळा बघून वधूवरांना शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शाहू महाराज, गाडगेबाबा व महाराष्ट्रातील अनेक संतांनी साधे रहा, विवाह समारंभात उधळपट्टी टाळा असा संदेश दिला आहे. महात्मा फुले यांच्या सत्याशोधक समाजात तर फक्त वधु वरांनी एकमेकांना हार घाला अन् विवाह झाला असे प्रत्यक्ष उदाहरणांतून दाखवून दिले. जे या विभूतींनी सांगीतले, ते 'कोरोना'ने समाजाला जगण्यास भाग पाडले आहे. त्याला फेसबुक सारखे तंत्र मदतीला आले तर, कोणाच्याही उपस्थितीशिवाय मात्र हजारोंच्या साक्षीने किती आनंददायी विवाह होऊ शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे.