दिंडोरी (नाशिक) - लॉकडाऊनच्या संकटामुळे येथील एका सोईक्स प्लोरा जातीच्या गुलाबाची निर्यातही थांबली आहे. यामुळे या गुलाबाच्या शेतीवरही नांगर फिरवावा लागला आहे. यामुळे 3 ते 4 कोटींचे आर्थिक नुकसान झाल्याचे, येथील सोईक्स प्लोरा कंपनीचे व्यवस्थापक सुशील खडसे यांनी सांगितले आहे.
सुशिल हे गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरखेड येथे नऊ हेक्टरमध्ये गुलाबाच्या विविध जातीच्या फुलाची शेती करतात. या शेतीमुळे पिंपरखेड परिसरातील चारशे मजूरांची उपजिविका भागवली जाते. या फुलांची परदेशात निर्यात केली जात होती. मात्र, यावर्षी कोरोनामुळे या निर्यातीवरही संकट आले आहे. यामुळे मजूरांची हातातील कामे बंद झाली आहेत. याच परिस्थितीत या फुल शेतीवर नांगर फिरवण्याची वेळ आली असल्याचे व्यवस्थापक सुशील खडसेंनी सांगितले.
दरवर्षी, फादर्स डे, मदर्स डे, फ्रेन्डशिप डेच्या दिवशी गुलाबाच्या फुलाला संपूर्ण भारतातून मागणी असते. मात्र, यावर्षी कोरोना संसर्गामुळे सर्व प्रकारच्या धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे. कार्यक्रम रद्द झाल्याने या फुलांची मागणी नाही. फुलांना मागणीच नसल्याने फुल शेती उत्पादक शेतकरी पूर्णपणे हतबल झाले आहेत. लाखो रुपयांचे उत्पन्न देणारी बाग तयार केली होती. बाग तयार करून ती ट्रॅक्टरने नांगरणी केल्यामुळे 3 ते 4 कोटींचे नुकसान झाले आहे, असेही खडसे यांनी सांगितले.
हेही वाचा - पनवेलमधील नवीन पाच कोरोनाबाधितांमध्ये पोलीस, पत्रकार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश