नाशिक: पावसाळा सुरू होताच डेंग्यू, मलेरिया या आजारांनी डोके वर काढले आहे. यासोबत आता नव्याने काही दिवसांपासून डोळ्याची साथ मोठ्या प्रमाणात शहरात पसरत आहे. ही साथ शहरातील सातपूरसह अशोकनगर, सावरकर नगर, पपया नर्सरी, आनंद छाया या भागात सर्वाधिक आहे. या भागात डोळ्यांच्या साथीचे 500 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. ते महानगरपालिका तसेच खासगी रुग्णालयात औषधोपचार करत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेत सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचा सल्ला महानगरपालिका अधिकाऱ्यांनी दिला आहे. संसर्ग झाल्यास त्यावर कोणताही घरगुती उपचार न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
भाजी बाजार बंद: सातपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून डोळे दुखण्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. पावसाळी वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया सारख्या आजार पसरत असताना, आता डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. सातपूर परिसरात पाचशे रुग्ण आढळून आले असून याचा परिणाम येथील व्यवहारांवर होत आहे. डोळे येणे हा संसर्गजन्य आजार असल्याने भीतीपोटी काही ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. भाजी मार्केटमध्ये देखील ग्राहक फिरकत नसल्याने भाजीपाला विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
ही आहेत लक्षणे: डोळे आलेल्या रुग्णाचे डोळे लाल होतात. डोळ्याला खाज येते, डोळ्यातून पिवळे द्रव बाहेर येते. तसेच काही रुग्णांना स्पष्ट दिसण्यास त्रास होतो. अशा परिस्थितीत रुग्णांनी घरीच उपचार न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
ही घ्या काळजी: नाशिकमध्ये वातावरणात बदल होत असल्याने साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. सध्या डोळ्यांची साथ पसरली आहे. यामध्ये लहान मुलांचा समावेश अधिक आहे. त्यामुळे लहान मुलांना डोळे आल्यास त्यांची विशेष काळजी घ्यावी. मुलांनी डोळ्याला हात लावल्यास नंतर हात स्वच्छ पाण्याने साफ करावे. डोळ्यावर गॉगल लावावा तसेच मुलांना सार्वजनिक ठिकाणी पाठवू नये. मुलांना दिसण्यास त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरकडे नेऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद भराडीया यांनी केले आहे.