नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या कामात टाळाटाळ करणारे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्राची वाजे यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दोषारोपत्र तयार केले आहे. पुढील कारवाईसाठी हे पत्र राज्यातील सचिवांकडे पाठविण्यात आले असून निवडणुकी संदर्भातील ही पहिलीच कारवाई असल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे अधिकारी नितीन बच्छाव यांनीही मांढरे यांना तंबी दिली आहे.
जिल्ह्यात १० मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे जिल्हा प्रशासनाने निवडणुकीच्या कामाची जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांना अधिक चांगल्या सुविधा पुरविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मतदार याद्यांबाबत आढावा बैठका घेतल्या. परंतु, वारंवार निरोप देऊन ही वाजे या बैठकांना गैरहजर राहिल्या. त्यातच निवडणूक कामासाठी शासकीय वाहन जमा करण्याच्या सूचना देऊनही वाजे यांनी वाहन जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेली नाही. त्यामुळे संतापलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी वाजे यांना २० मार्चला कारणे दाखवा नोटीस बजावली.
त्यांना तत्काळ खुलासा करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, त्यानंतरही वाजे यांनी नोटीशीला वेळेत प्रतिसाद दिला नाही. वाजे यांनी २६ मार्चला खुलासा करणारे पत्र प्रशासनाला दिले. त्यात इतर कारणांमुळे बैठकांना येणे शक्य होणार नसल्याचे नमूद केले निवडणुकीचे काम हे शासकीय कर्तव्य असतानाही वाजे त्यात कसूर करीत असल्याच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी ३१मार्चला वाजे यांच्याविरुद्ध दोषारोप पत्रावर स्वाक्षरी केली. पुढील कारवाईसाठी हे पत्र सचिवांना पाठविण्यात आले आहे. सचिवांच्या पुढील पंधरा दिवसांमध्ये त्यावर निर्णय येण्याची आशा असून यामध्ये वाजे यांचे निलंबन अथवा बदलीची कारवाई होऊ शकते, अशी शक्यता अधिकारी वर्गाने वर्तवली आहे.
नितीन बच्छाव हे देखील काही बैठकांना गैरहजर राहिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनाही नोटीस बजावली होती. त्यावर बच्छाव यांनी वेळेत योग्य खुलासा सादर केला, त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी त्यांना तंबी दिली आहे.