नाशिक: कांदा उत्पादनाला कमी भाव मिळत असल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या अडणीत सापडले आहेत. त्यांच्या उत्पादनांना रास्त भाव मिळत नाही. त्या मुळे सर्वांच्या पसंदीचा कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात याच कांद्यांमुळे अक्षरश: पाणी येत आहे. त्यांना मिळणाऱ्या दरामुळे कांदा उत्पादनासाठी त्यांनी केलेला खर्च ही निघत नाही अशी परस्थिती निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोदी सरकारला एक तर रास्त भाव द्या अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या अशी मागणी केली आहे.
आपली कैफियत मांडताना शेतकऱ्यांनी सांगितले की, बाजारात कांदे 300 ते 400 रुपये किलोने विकले जात आहेत. मात्र आम्हाला त्याचे उत्पादन करण्यासाठी त्या पेक्षा खुप जास्त खर्च आलेला आहे. आम्ही आता यावर 1 रुपयाही खर्च करु शकत नाहीत. सरकारचे आमच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. कोणत्याही सरकारला आमची चिंता नाही. सरकारने आमच्या उत्पादनाला रास्त भाव द्यावा अन्यथा आम्हाला आत्महत्येची परवानगी द्यावी आम्ही आमच्या मुलांसाठी 10 रुपयाचे चाॅकलेट विकत घेण्याचाही विचार करु शकत नाहीत आमच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एका शेतकऱ्याने कांद्याला कमी भाव मिळात असल्या बद्दल निराशा व्यक्त केली. आमच्याकडे एक एकर क्षेत्रात कांदे आहेत. मी सोने गहाण ठेवून कांदे पिकवले आहेत. माझा एकूण खर्च ५० हजार रुपये होता आणि जेव्हा मी बाजारात गेलो तेव्हा मला २० हजार रुपयेही मिळाले नाहीत. केंद्र सरकारने याबाबत काहीतरी केले पाहिजे.आम्ही कांदा पिकवण्यासाठी खूप मेहनत घेतो, पण दुर्दैवाने आम्हाला योग्य भाव मिळत नाही. आम्हाला आमचे जीवन संपवण्याची वेळ आली आहे काअसा उध्विग्न प्रश्न शेतकरी आता विचारत आहेत.
शेतकरी सांगतात की, आम्ही कांद्याचे उत्पादन घेण्यासाठी तीन ते चार महिन्यांपूर्वी तयारी सुरू केली, आता जेव्हा आम्ही बाजारात गेला तेव्हा आम्हाला फक्त 300-400 रुपये मिळतात. आम्हाला हे उत्पादन घेण्यासाठी जवळपास 50 ते 60 हजार रुपये खर्च करावे लागतात. आम्हाला फक्त एका ट्रॅक्टर साठी सुमारे 10 ते 11 हजार रुपये लागतात. नफा तर सोडाच पण आमचा लावलेला खर्चही निघत नाही उलट आम्हाला फक्त नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. सरकारने वेळीच मार्ग काढून आम्हाला न्याय न दिल्यास आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथिल शेतकरी राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याने सोलापूर मार्केट यार्डात 17 फेब्रुवारी रोजी 500 किलो कांदा विकला त्यावेळी कांद्याचे दर इतके घसरले होते की त्यांना प्रति क्विंटल केवळ 1 रुपया दर मिळाला मोटार भाडे, हमाली, तोलाई, याचे पैसे वजा करुन फक्त दोन रुपये शिल्लक राहिले. 500 किलो कांदा विकल्यानंतर शेतकऱ्याला केवळ 2 रुपयाचा धनादेश तोही पुढच्या म्हणजे 8 मार्च या तारखेचा मिळाल्याची माहिती समोर आली आणि एकच खळबळ उडाली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती तर त्या शेतकऱ्यांनी ही आत्महत्येचा इशारा दिला आहे.