नाशिक- पोटाची खळगी भरण्यासाठी सुरगाणामधील शेतमजूर दिंडोरी तालुक्यात जातात. सध्या राज्यात कोरोनाची साथ चालू असल्याने कर्फ्यू लावण्यात आला आहे आणि अत्यावश्यक दुकाने सोडून इतर सर्व अस्थापने बंद आहेत. त्यामुळे, कामाअभावी शेतमजूर आपल्या गावी परतत आहे. मात्र, गावी जाण्यासाठी एसटी किवा इतर वाहन नसल्याने शेतमजुरांना पायीच घरी जावे लागत आहे.
द्राक्ष तोडण्यासाठी जिल्ह्यातील शेतमजूर दिंडोरी, निफाड व चांदवड तालुक्यात येतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र बंदचे चित्र आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व तालुक्यातील द्राक्ष कंपन्यांचे कामही बंद पडले आहे. त्यामुळे, सदर तालुक्यांमध्ये द्राक्ष तोडण्यासाठी बाहेरून आलेल्या मजुरांना द्राक्ष उत्पादकांनी घरी जाण्याचा सल्ला दिला. मात्र, घराकडची वाट धरणाऱ्या या शेतमजुरांना वाहन सुविधा नसल्याने शेकडो किलोमीटरचा प्रवास करून घरी जावे लागत आहे. पायी जाणाऱ्यांमध्ये महिला आणि बालकांचा सुद्धा समावेश आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आपात्कालीन स्थितीमुळे मजूर आहे त्या तालुक्यात अडकले आहेत. शासनाने प्रवासी वाहतूक सेवा पुरवावी अशी मागणी मजुरांनी केली आहे.
हेही वाचा- 'इटलीचे पंतप्रधान रडकुंडीस आलेत; आपल्याकडे असं होऊ नये, म्हणून घराबाहेर पडू नका'