नाशिक - राज्य सरकारने पाडव्यापासून मंदिर सुरू करण्यास परवानगी दिल्यानेतर सुद्धा कोरोनाच्या भीतीने भाविकांनी श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराकडे पाठ फिरवल्याने चित्र दिसत आहे. मंदिर प्रशासनाने दिवसभरात एक हजार नागरिकांना दर्शन घेण्याची सोय करून सुद्धा दिवसभरात फक्त 400 ते 500 भाविक दर्शनाचा लाभ घेत आहे.
देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिराचे दरवाजे पाडव्यापासून खुली करण्यात आली आहेत. पाडव्याचा मुहूर्त साधत त्र्यंबकेश्वर गावातील आणि नाशिक शहरातील एक हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. मात्र, दुसऱ्या दिवसापासून कोरोनाच्या भीतीमुळे भाविकांनी मंदिराकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. मंदिर प्रशासनाने दिवसभरात एक हजार नागरिकांना दर्शन घेण्याची सोय करून सुद्धा दिवसभरात फक्त 400 ते 500 भाविक दर्शनाचा लाभ घेत आहे.
भाविकांमध्ये कोरोनाची भीती -
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, दिल्लीप्रमाणे नाशिकमध्ये कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी भीती नागरिकांना वाटत आहे. सध्या स्थितीत मंदिर खुली करून सुद्धा भाविक मंदिरात गर्दी करण्याचे टाळत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात बाराही महिने भाविकांची मोठी गर्दी होत असते. देशभरातील भाविक रोज हजारोच्या संख्येनं मंदिरात गर्दी करत असतात. तसेच नारायण नागबलीसारखा धार्मिक विधी करण्यासाठी भाविकांची गर्दी मंदिर परिसरात होते. मात्र, सद्य परिस्थिती भाविकांमध्ये कोरोनाची भीती असल्याने इतर राज्यातील भाविक अद्याप त्र्यंबकेश्वरला येत नसल्याचे दिसत आहे.
मंदिरात गर्दी होऊ नये, यासाठी दिवसभरातून फक्त एक हजार भाविकांना दर्शन देण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच मंदिरात प्रवेश करताना भाविकांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच मंदिर व परिसर स्वच्छतेसोबत दिवसातून तीन वेळा सॅनिटाइझ करण्यात येत आहे.
मंदिरावर अवलंबून असलेले पूरक व्यवसाय अडचणीत -
त्र्यंबकेश्वर गावातील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह मंदिरावर अवलंबून आहे. कोरोनामुळे मागील सात महिन्यापासून मंदिर बंद असल्याने येथील व्यवसायिकांना उदरनिर्वाहचा मोठा प्रश्न भेडसावत होता. मात्र, आता मंदिर सुरू झाल्यानंतर तरी पुन्हा एकदा मोठ्या संख्येने भाविक येतील, अशी अपेक्षा येथील व्यावसायिकांना होती. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे भाविकांनी मंदिराकडेचं पाठ फिरवल्याने येथील व्यवसायिक चिंतेत आहेत. येथील फुल विक्रेते, पूजा साहित्य विक्रते, हॉटेल व्यवसायीक, ट्रॅव्हल चालक आणि इतर दुकानदारांचा व्यवसाय अवलंबून आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जानेवारी 2021 मध्ये भाविक मोठ्या संख्येने मंदिरात येतील असे मत काही जाणकारांनी व्यक्त केलं आहे.
इतर मंदिरातही भाविकांची गर्दी कमी -
श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदीराबरोबर नाशिक जिल्ह्यात देवीच्या साडे तीन शक्तीपीठ पैकी एक असलेले सप्तशृंगी मातेचे मंदिर, चांदवड येथील प्राचीन रेणुका माता मंदिर, नाशिकच्या पंचवटी परिसरातील प्राचीन काळाराम मंदिर, श्री कपालेश्वर महादेव मंदिर, भगूर येथील रेणुका माता मंदिराकडे देखील भाविकांनी पाठ फिरवली आहे. या मंदिरात देखील भाविक कमी प्रमाणात दर्शनासाठी येतात.