नाशिक - (मनमाड) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती शांतपणे व कुठलाही गाजावाजा न करता साजरी करण्यात आली. प्रशासनाच्या वतीने येथील स्टेशन समोरील असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. इतिहासात प्रथमच आंबेडकर यांच्या जयंती निमित्त एकही भीमसैनिक रस्त्यावर आला नाही. सर्वानी आपापल्या घरातच बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.
मनमाड शहर हे आंबेडकर चळवळीतील अग्रगण्य शहर म्हणून ओळखले जाते. डॉ आंबेडकर यांचा मनमाड शहरास अनेकदा सहवास लाभला आहे. राज्यात नव्हे तर देशात तिसऱ्या क्रमांकाची आंबेडकर जयंती मनमाड शहरात साजरी करण्यात येते. सोलापूर, औरंगाबाद खालोखाल मनमाड जंक्शन येथे भीम जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी होते. येथे बहुसंख्य बौद्ध नागरिक असल्याने एक मोठा उत्सवच साजरा होतो. जवळपास 125 ते 150 चित्ररथ काढून रात्रभर मिरवणूक सुरू असते. शहरातील चौकाचौकात भव्य असे डिजिटल फलक लावण्यात येतात. मात्र, कोरोनामुळे जमावबंदी व संचारबंदी चे आदेश असल्याने सार्वजनिक जयंती उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आहे.यामुळे हजारोंचा जमणारा जनसमुदाय मात्र आपल्या घरूनच भिम जयंती साजरा करताना दिसला. पोलिसांनी व पालिका प्रशासनाने याबाबत चांगल्या प्रकारे जनजागृती केल्याने कोणीही रस्त्यावर आले नाही.
मनमाड येथील अनेक राजकीय पक्ष सामाजिक संघटना तसेच सार्वजनिक जयंती उत्सव समिती भिमोत्सोव आयोजन समिती यांनी यावर्षी आयोजित करण्यात आलेले विविध व्यख्यान, सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत. देशावर आलेले संकट दुर झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्याचे ठरवण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या 12 वाजेपर्यंत साऊंड वाजविणे या निर्णयाला देखील आवाहन करत भिम जयंती साजरी करण्यात येत होती. मात्र, कोरोनाचा विषय गंभीर असल्याने यावर्षी सर्वानी घरीच भिमजयंती साजरी केली.