नाशिक - जिल्ह्यात जेव्हा कोरोना विषाणूची साथ आली तेव्हा शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात कोरोनाच्या भीतीने इतर व्यवसायांसोबत अनेक डॉक्टरांनी देखील आपले दवाखाने बंद केल्याचे चित्र होते. काही ठिकाणी सरकारी आरोग्य यंत्रणांसोबत मिळून खासगी डॉक्टरांनी आपल्या जीवाची परवा न करता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार केले. अशा डॉक्टारांमध्ये नाशिकच्या गंगापूर रोड भागातील डॉ. अतुल वडगावकर यांचे नाव आवर्जुन घ्यावे लागेल. डॉ. वडगावकर यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना धीर देण्याचे काम तर केलेच पण, त्यांना होम क्वारंटाइन ठेऊन कोरोना मुक्त देखील केले. वर्षभरात त्यांनी 5 हजारपेक्षा अधिक रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे. आता देखील ते दररोज 200 ते 300 रुग्णांना तपासून अल्प दारात उपचार देत सामाजिक बांधिलकी जपत आहेत.
मागील वर्षी जेव्हा कोरोनाची लाट आली होती, तेव्हा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण होते. हीच भीती काढण्यासाठी आमच्या हॉस्पिटल समोरील जागेत ओपन क्लिनिक सुरू करून रुग्णांना तपासण्यास सुरुवात केली. मोकळे वातावरण असल्याने रुग्णांना देखील त्याचा फायदा झाला. मागील वर्षभरापासून दररोज 200 ते 250 रुग्णांची तपासणी केली. त्यांची कोरोनाची लक्षणे बघून त्यांना सल्ला देऊन उपचार केले. आतापर्यंत 5 हजारपेक्षा जास्त रूग्णांना होम क्वारंटाइन करत कोरोना मुक्त केले आहे. ज्या रुग्णांना कोरोनाची तीव्र लक्षण आहेत, अशांना अॅडमिट करून त्यांच्यावर उपचार केल्याची माहिती डॉ. अतुल वडगावकर यांनी दिली.
अनेक हॉस्पिटलबाबत तक्रारी -
एकीकडे डॉ. अतुल वडगावकरांसारख्या डॉक्टरांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना धीर देत अत्यल्प शुल्क आकारून त्यांना कोरोना मुक्त केले आहे. तर अनेक बड्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सर्रास लूट झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. यामुळे नाशिक महानगरपालिकेला सर्वसामान्य नागरीकांची होणारी लूट थांबवण्यासाठी प्रत्येक कोविड हॉस्पिटलमध्ये लेखा परिक्षक नेमावे लागले. त्या माध्यमातून आता रूग्णांचे पैसे वाचत आहेत.
कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना बँडची सक्ती -
कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये होम क्वारंटाइनमध्ये असलेले अनेक रूग्ण घराबाहेर फिरत असल्याच्या तक्रारी महानगरपालिकेला प्राप्त होत आहेत. डॉक्टर वडगावकरांनी यासाठी एक उपाय शोधून काढला. त्यांच्या दवाखान्यात येणाऱ्या एखाद्या रुग्णाला खोकला, ताप, सर्दी, अंगदुखी सारखी कोरोनाची लक्षण असतील तर त्यांना आरटीपीसी चाचणी करण्यास सांगितली जाते. त्याचा चाचणी अहवाल येऊपर्यंत त्याच्या हाताला होम क्वारंटाइनचा बँड बांधतो जातो. एक-दोन दिवसांनी रिपोर्ट निगेटिव्ह आला तर हा बँड काढला जातो, नाही तर पुढील उपचारांपर्यंत हा बँड पेशंटच्या हाताला असतो. या बँडमुळे इतर नागरीकांना देखील समजते की हा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे. तसेच पोलिसांना हा रूग्ण घराबाहेर दिसल्यास त्याच्यावर कारवाई करण्यास सोपे होते.
ज्या कंपनीची लस घेतली तीच दुसऱ्यांदा घ्यावी -
सध्या सर्वत्र कोरोना लसीकरणाचे काम सुरू असून आतापर्यंत नाशिक शहरात 75 हजारांपेक्षा अधिक जणांना लस देण्यात आली आहे. मात्र, लस घेताना प्रत्येक नागरीकाने आपण कोविशिल्ड लस घेतली की, कोव्हॅक्सीन लस घेतली हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण दुसऱ्यांदा तीच लस घेणे गरजेचे आहे. अनेक लोकांना याची कल्पना येत नाही. यासाठी शासनाने लस दिल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या बँडचा वापर केला तर ते सर्वांसाठी फायद्याचे होईल, असे मत डॉ. अतुल वडगावकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - सोमवारी राज्यात 24 हजार 645 कोरोनाबाधितांची नोंद