नाशिक - जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त निधी जनतेच्या अपेक्षापूर्तीसाठी वेळेत आणि योग्य रितीने खर्च करावा. प्रलंबित कामे जलदगतीने करून लोकांच्या समस्यांना न्याय द्या' अशी सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. विविध प्रकल्पांसाठी १८५.२४ कोटी रुपयांच्या विशेष वाढीव निधीची मागणी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी उज्ज्वला बावके, सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पंकज आशिया, जिल्हा नियोजन अधिकारी योगेश चौधरींसह सर्व आमदार आणि जिल्हा परिषद सभापती उपस्थित होते.
हेही वाचा - कोरेगाव-भीमा प्रकरण: 'सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबण करण्याचा केंद्र सरकारला अधिकार'
२०१९-२०२० मध्ये सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना आणि अनुसूचित जाती उपयोजना असा एकूण ७९१.२३ कोटींचा नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. यापैकी ४७४.७४ कोटींचा निधी प्राप्त झाला असून त्यापैकी ३१४.७३ कोटी खर्च करण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसात प्राप्त निधीच्या तुलनेतील खर्चाची टक्केवारी ४० टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
हेही वाचा - थायलंडच्या महिलेचा कोलकाताच्या रुग्णालयात मृत्यू; कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचा संशय..
सर्व साधारण योजना ७८ कोटी, आदिवासी उपयोजना ७३.२४ आणि गंगापूर बोट क्लब, कलाग्राम, शिवाजी स्टेडियम, जिल्ह्याची १५० वर्षपूर्ती, साहसी प्रशिक्षण केंद्र अंजनेरी, अशा विशेष प्रकल्पांसाठी ३४ कोटी असा एकूण १८५.२४ कोटी रुपयांच्या विशेष वाढीव निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती यावेळी पालकमंत्र्यानी दिली. ग्रामीण भागातील वीजेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वीज वितरण विभागासोबत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देशही भुजबळ यांनी दिले. या बैठकीत आदिवासी भागातील अंगणवाडी इमारत, विद्युत ट्रान्सफॉर्मर, ग्रामीण रस्ते यावर चर्चा करण्यात आली.