दिंडोरी ( नाशिक ) - तालुक्यातील महाजे येथे सरपंच आणि उपसरपंच निवडीदरम्यान दोन गटात राडा झाला असून परस्परांवर दगडफेक करण्यात आली. यात बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत .
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की तालुक्यातील महाजे या ठिकाणी सरपंच आणि उपसरपंच निवड प्रक्रिया आज राबविण्यात आली. यावेळी अचानक दोन्ही गट समोरासमोर आल्याने दोन्ही गटात बाचाबाची झाली. त्या बाचाबाचीचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने एकच कल्लोळ निर्माण झाला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच महिलेलाही मारहाण करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, पोलीस कर्मचारी बाळकृष्ण पझई, युवराज खांडवी, हेमंत पवार, पठाण आदी दिंडोरी पोलीस ठाण्याचे कर्मचारीही या दगडफेकीत जमाव पांगवतांना जखमी झाले आहेत. यावेळी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला तेव्हा परिस्थिती हाताळण्यात पोलिसांना यश आले. रुपाली सोमनाथ भोये या महीलेला वाचवण्यात ए .पी आय कल्पेश कुमार चव्हाण व पोलीस यंत्रणेला यश आल्याचे सांगीतले.
यानंतर सदर घटना स्थळी दंगा नियंत्रण कक्षाचे पोलिस बोलवण्यात आले आहेत. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल कारण्याचे काम सुरू आहे. अधिक तपास दिंडोरी पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण व दिंडोरी पोलीस करत आहेत.