दिंडोरी (नाशिक) - संपूर्ण जगात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असताना सर्वच शाळा, कॉलेज व महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्याकरता दिंडोरी पंचायत समितीकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याकरता शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे.
दिंडोरी केंद्रातील जनता इंग्लिश स्कुल माध्यमिक विभाग, उच्च माध्यमिक विभाग व अभिनव बालविकास व इतर शाळेतील शेकडो शिक्षकांची ऑनलाईन कार्यशाळा पार पडली. दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज यांनी प्रशिक्षणाचे ऑनलाइन उद्घाटन करून प्रशिक्षणाचा उद्देश सांगितला. शिक्षण विस्तार अधिकारी व कार्यशाळेचे नियंत्रक एस. पी. पगार यांनी प्रास्तविक करून प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. प्राचार्य बी. जी. पाटील यांनी कार्यशाळेतील सर्वांचे स्वागत केले.
शाळा बंद तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण राहणार सुरू-
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिंडोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बी. डी. कनोज म्हणाले, की शाळा बंद असताना विद्यार्थ्यांना घरी बसून विविध तंत्राच्या माध्यमातून ज्ञानदानाचे काम सुरू ठेवण्याचा हेतू आहे. त्यासाठी आम्ही सर्वप्रथम दिंडोरी तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना तंत्रस्नेही यांच्यामार्फत दररोज १०० शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण देत आहोत. आमचे हेच शिक्षक सर्व माध्यमाचा वापर करून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करत आहे. त्यामुळे शाळा जरी बंद असल्या तरी शिक्षण मात्र सुरुच राहणार आहे.
जिओमिट, गुगल क्लासरुमसह इत तांत्रिक मार्गदर्शन-
तंत्रस्नेही प्रकाश चव्हाण, विलास जमदाडे, दत्तात्रय चौगुले, नौशाद अब्बास यांनी झूममिट, गुगलमिट, जिओमिट, गुगल क्लासरुमचा वापर करण्याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले. टेलिग्रामवरील नाशिक शिक्षण हेल्पलाईन चॅनल, जिओ चॅट, एमससीईआरटीचे चॅनल तसेच व्हिडीओ कॉलिंग, कॉन्फरन्सिंग व गुगलवर ऑनलाइन टेस्ट तयार करणे याविषयी प्रात्याक्षिक करून दाखविले. कार्यशाळेत विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घ्यावा, यासंदर्भात परिपूर्ण मार्गदर्शन करून शंकांचे निरसनही त्यांनी केले.
या प्रशिक्षणात एकूण १०० शिक्षक सहभागी झाले होते. प्रशिक्षण संपल्यावर शिक्षकांना पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी प्राचार्य बी. जी. पाटील, उपमुख्याध्यापक यु. डी. भरसट, पर्यवेक्षक बी. बी. पुरकर, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विभातील शिक्षक सहभागी झाले होते. ऑनलाईन कार्यशाळेला उपस्थित राहिल्याबद्दल संतोष कथार यांनी शिक्षकांचे मानले.