नाशिक- आज देशात सर्वत्र उत्साहाने होळीचा सण साजरा केला जात आहे. नांदगाव तालुक्यातही रंगांची उधळण करून धूळवडीचा आनंद घेतल्या जात आहे. मात्र, तालुक्यातील बंजारा लोकांच्या तांड्यावर होळीच्या दुसऱ्या दिवसाला विशेष महत्व आहे. येथे धुळवडीच्या दिवशी वर्षभरात जन्माला आलेल्या मुलांचे नामकरण करत धुंड साजरी केली जाते. ही परंपरा कायम ठेवत आजही तालुक्यातील बंजारा समाजाने मोठ्या प्रमाणात धुंड सण साजरा केला.
नांदगाव तालुक्यातील लोहशिंगवे, न्यायडोंगरी, माळेगाव यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आहे. होळीनंतर धुलीवंदनला हा समाज आपली शेकडो वर्षाची जुनी परंपरा असलेला धुंड उत्सव साजरा करतो. आजही या भागात सर्वच तांड्यांवर धुंड उत्सव साजरा करण्यात आला. वर्षभरात ज्या मुलांचा जन्म झाला त्यांचे नामकरण आज केले जाते. ज्या घरात मुलांचे नामकरण असते त्या घरातील आजी किंवा आईच्या मांडीवर लहान मुलाला पांढरा पोशाख घालून बसविले जाते आणि त्यांच्या डोक्यावर लाकूड आडवे धरून अन्य नातेवाईक त्यावर काठ्या मारून गाणी म्हणतात.
बंजारा भाषेत त्याला आर्शिवाद देणे असे मानतात. यावेळी वाद्याच्या तालावर बंजारा महिला लेंगी नृत्य सादर करतात. त्यानंतर सुरू होतो तो मुख्य धुंडीचा कार्यक्रम. यात मोकळ्या जागेत दोन खुंटे रोवले जातात. त्यामध्ये एक हंडा ठेवलेला असतो ज्यात गुळाची लापशी, पुऱ्या असे पदार्थ ठेवून तो त्या खुंटाला बांधून ठेवतात. पुरुष मंडळी खुंटीतून हंडा सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात तेव्हा महिला त्यांना काठीने मारतात. हा खेळ फक्त दीर व भावजयी खेळतात. या खेळाचे देखील विशेष महत्व असून अनेकजण या खेळाचा आनंद घेण्यासाठी खास आपल्या तांड्यांवर एकत्रित होतात. एकूणच बंजारा समाजात साजरा होणारा होळीचा सण एक दिवस अगोदर साजरा होत असला तरी धुळवडीच्या दिवशी साजरा होणाऱ्या धुंडीला मात्र विशेष महत्व असते. तालुक्यातील अनेक ठिकाणी असलेल्या तांड्यांवर आज मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा करण्यात आला आहे.
हेही वाचा- नाशिकच्या पिंपळगाव बसवंतमध्ये भीषण आग, अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी