नाशिक - भाजप दबाव व भीतीचे राजकारण करत नाही. सत्ताधारी पक्षाकडून कोरोनाविरोधात कामाची अपेक्षा आहे. मात्र, सत्ताधारी पक्ष कोरोना विरोधात न लढता भांडत आहे. माझी त्यांना विनंती आहे, की त्यांनी आपआपसात न भांडता कोरोना विरोधात लढावे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आरोपाचा व सत्ताधाऱ्यांचा आज समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस मालेगाव दौऱ्यावर असताना पत्रकरांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
मालेगाव दौऱ्यात एम.एस.जी.कॉलेजमधील कोविड सेंटरला भेट देत रुग्णांशी संवाद साधला. उपस्थित कोविड रुग्णांना लवकरात लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा देत प्रशासन, पोलीस व डॉक्टरांनी केलेल्या कामाचे फडणवीस यांनी कौतुक केले. दरम्यान, शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत मालेगावमधील परिस्थितीचा आढावा घेतला. महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार व पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी कोविड नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या उपाय योजना नमुद केल्या.
देवेंद्र फडणवीस यांनी मालेगावच्या एमएसजी कॉलेजच्या कोविड सेंटरला भेट देत मालेगाव परिस्थितीबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार भारती पवार, आमदार राहुल आहेर आदी उपस्थित होते.