नाशिक - कोरोनाचा आकडा कमी दाखवण्यासाठी सरकार मुंबईत कमी चाचण्या करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबई मोठ्या संख्येने चाचण्या होणे गरजेचे असून रोज 25 हजार चाचण्या सरकारने केल्या पाहिजे, असेही ते म्हणाले. नाशिकला कोरोनाबाबतचा आढावा घेण्यासाठी आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
आयसीएमआरने अग्रेसिव्ह टेस्टिंगची गाईडलाईन दिली आहे. कोरोना चाचण्यांचा वेग वाढविण्याची आवश्यकता असून रुग्णांना खाटा आणि चाचण्यांचा अहवाल वेळेवर मिळत नाही. हे अहवाल 24 तासात येणे आवश्यक आहे. मात्र, अहवाल वेळेत येत नसल्याने उपचार सुरू होत नाही. त्यामुळे मृत्यूदर वाढत आहे. सरकारच्या बिलाबाबतच्या आदेशाचा गैरफायदा खासगी रुग्णालय घेत आहेत. सरकारने आदेशामध्ये त्वरीत सुधारणा केली तर खासगी रुग्णालयाला चाप बसेल. अनेक खासगी रुग्णालयामध्ये रुग्णांना अवाजवी बिलांचा मोठा फटका बसतोय. कोविड केअर सेंटर नुसते उभारून चालणार नाही. त्याठिकाणी ऑक्सिजनसह इतर व्यवस्था हव्यात, असेही फडणवीस म्हणाले.
मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिशाभूल करणारा आहे. दररोज फक्त 3300 चाचण्या केल्या. त्यामुळे पॉझिटिव्ह संख्या 806 आली. मुंबईत परिस्थिती अत्यंत भीषण आहे. सरकार फक्त कोरोनाचा आकडा कमी दाखवण्यासाठी चाचण्या कमी करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. यामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुंबईत हाय रिस्क कॉन्टॅक्टच्या चाचण्याच केल्या जात नाही. या चाचण्या मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.
कोरोना काळात केंद्र सरकारने राज्य सरकारला भरीव मदत दिली. याची पुस्तिका आम्ही छापली आहे. हे राज्याचा एकही मंत्री खोडू शकला नाही. हे सरकार आंतरविरोधानं पडेल, असेही ते म्हणाले. सामना छापतो देव पळून गेले आणि उद्धव ठाकरे विठ्ठलाला साकडे घालतात. आता सामनाला बेस राहिला नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा सामना आता उरला नाही. आताचे अग्रलेख कसे छापले जातात, हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला.
अधिकाऱ्यांच्या बदल्यात गडबड झाली. म्हणजे हे एकमेकांवर कुरघोडी करतात. तसेच यांच्यामध्ये संवाद नाही. याबाबत शरद पवारांना मध्यस्थी करावी लागते हे दुर्दैव आहे. तीन पॉवर सेंटर असल्याने हे होत असल्याचे फडणवीस म्हणाले.