नाशिक - शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आहेत. त्यांचा फोटो माझ्या कार्यालयात आताही आहेच. तसेच मी प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सिल्व्हर ओकवर गेलो होते. तिथे शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील होत्या. तेथे राजकीय विषयावर चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री सिलव्हर ओक गाठले होते. त्यानंतर चर्चांना उधाण आले होते.
एनडीएच्या बैठकीला जाणार- उपमुख्यमंत्री अजित पवार हे 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. मोदींनी अनेक निर्णय घेतले आहेत. समान नागरी कायद्याचा ड्राफ्ट पाहिला की आम्ही आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत. सध्या फक्त चर्चा सुरू आहे. येत्या १८ जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला जाणार आहे. एनडीएच्या बैठकीला मी आणि प्रफुल्ल पटेल हजर राहणार आहोत. त्यावेळी दुष्काळाबाबत आम्ही चर्चा करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
विरोधकांना डिवचले - विरोधी पक्षनेता निवडीवर अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, विरोधी पक्षनेता हा अधिवेशनावेळी निवडला जातो. तसेच तो निवडीबाबतचा अधिकार हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आहे. तसेच विरोधी पक्षनेत्याचे नाव हे विरोधकांना विधानसभा अध्यक्षांना द्यायचे असतात. त्यामुळे विरोधी पक्षनेताबाबतचा प्रश्न विरोधकांना विचारा, असे अजित पवार म्हणाले.
परिवाराला महत्व - शुक्रवारी काकींचे (प्रतिभा पवार) ऑपरेशन झाले होते. मला भेटायला थोडासा विलंब झाला होता. सुप्रियाने सिल्व्हर ओकवर बोलावले होते. त्यामुळे मी काकींना भेटण्यासाठी सिल्व्हर ओकवर गेलो होते. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, भारतीय संस्कृतीत परिवाराला महत्व आहे. शरद पवारपण तिथे होते. इतर कुठलीही चर्चा त्यावेळी झाली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, भेटीदरम्यान शरद पवार यांनी मला एक पत्र दिले आहे. शिक्षण विभागाबाबत ते पत्र होते. त्याबाबत नक्कीच विचार केला जाईल.
हेही वाचा -