नाशिक - अरबी समुद्रात तयार झालेले निसर्ग चक्रीवादळ ताशी १२० किलोमीटर वेगाने बुधवारी दुपारी आलिबागजवळ धडकले. साधारण अडीच वाजण्याच्या सुमारास वादळाने किनारा ओलांडून राज्यात प्रवेश केला. त्यानंतर मात्र पुढील सहा तासांमध्ये त्याची तीव्रता खूप कमी झाली. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात ठिकठिकाणी वादळामुळे झाडे कोसळली. या वादळाचा तडाखा नाशिक जिल्ह्यालाही बसला. मनमाड, येवल्यासह नाशिकच्या ग्रामीण भागात, जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी शेड, पोल्ट्री, फार्म, घरे उद्ध्वस्त झाली. तर झाडे देखील कोलमडून पडली. यामुळे रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा मनमाड, येवला, लासलगाव, चांदवड, मालेगाव यासह नाशिकच्या ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसला. वादळी वाऱ्यामुळे मनमाडला काही ठिकाणी झाडे कोलमडून पडली तर विजेचे खांब व तारा देखील तुटल्याने रात्रीपासून संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित झालेला आहे. येवल्याच्या अंदरसुल, धामणगाव परिसरात अनेक ठिकाणी पोल्ट्री फार्म, घरांची पडझड झाली. तर काही ठिकाणी झाडे देखील कोलमडली. पोल्ट्री फार्म उद्ध्वस्त होऊन शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाला.
चांदवड, बागलाण, मालेगाव, सटाणा, नांदगाव भागाला देखील वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. निसर्ग चक्रीवादळाचे रौद्ररूप पाहता, याचा मोठ्या प्रमाणात फटका बसेल असे वाटत होते. पण यात काही प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी अलिबागजवळ धडक दिली. मुंबई आणि ठाण्याला वादळाचा तडाखा वर्तवलेल्या अंदाजांपेक्षा कमी बसला. पण, रायगड जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. अलिबाग तालुक्यात विजेचा खांब कोसळल्याने एकाचा, तर श्रीवर्धन तालुक्यात वृक्ष पडून एका लहान मुलाचा मृत्यू झाला.
हेही वाचा - येवल्यात साप तस्करी करणाऱ्या दोघांना अटक, दोन मांडूळ जप्त
हेही वाचा - सप्तश्रृंगी गडावर दरड कोसळली; जिवीतहानी नाही