नाशिक - नांदगांव तालुक्यातील अनेक भागात शनिवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानाची कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सरकारला पाठवला आहे. या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात येणार आहे.
या पावसाचा फटका गहू, हरभरा आणि कांद्याला बसला. अनेक ठिकाणी काढणीला आलेला गहू भुईसपाट झाला, तर कांदे भिजून खराब झाले. जळगाव बुद्रुक, जळगाव खुर्द, पिंपरखेड, परधाडी, डॉक्टरवाडी, बाभूळवाडी या भागात पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करून शासनाने न्याय द्यावा, अशी मागणी आता शेतकरी करीत आहे.
हेही वाचा - 'मोदी-शाह यांनी देशाच्या राजधानीचा चेहरा विकृत केला'
कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा एक ना अनेक संकटात शेतकरी सापडला आहे. ऐन उन्हाळ्यात अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शेतीतून चांगले उत्पन्न होऊन दोन पैसे गाठीशी उरतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, अचानक आलेल्या या आपत्तीने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला.