नाशिक- मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील पिकांचे तसेच फळबागांचे मोठे नुकसान केले. हातातोंडाशी आलेले उत्पन्न निसर्गाच्या अवकृपेने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. नाशिक येथील नांदगाव तालुक्यात देखील वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात द्राक्ष, आंबा, संत्री बागांसह पिकाचेही नुकसान झाले आहे.
हेही वाचा- सुखवार्ता! व्हॉट्सअॅपने सुरू केले 'डार्क मोड' फीचर
अवकाळी पावसाने पिंपरखेड येथील द्राक्ष बाग तसेच मोसंबी आणि आंब्याला आलेल्या मोहराचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास 900 हेक्टरवरील क्षेत्राला अवकाळीचा फटका बसला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी दिली आहे.
कधी अवकाळी, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा अनेक संकटात शेतकरी सापडत आहेत. एका पाठोपाठ एक येणारे नैसर्गिक संकटे शेतकऱ्यांचा पिच्छा सोडताना दिसत नाही. शनिवारी सायंकाळी व रात्री नांदगांव तालुक्यातील अनेक भागाला जोरदार अवकाळी पावसासह गारपीट झाली.
ऐन उन्हाळ्यात अचानक झालेला पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. पावसाचा फटका गहू, हरभरा व खळ्यात, मळ्यात उघड्यावर काढून ठेवलेल्या कांदा, ज्वारीला बसला आहे. तसेच द्राक्ष बाग व संत्री, आंबा या फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी तर काढणीला आलेला गहू भुईसपाट झाला तर कांदे भिजून खराब झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
जळगाव बुद्रुक, जळगाव खुर्द, पिंपरखेड, परधाडी, डॉक्टरवाडी, बाभूळवाडी या भागात पिकांचे जास्त नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकारी यांनी तत्काळ सर्व भागाची पाहणी करून सोमवारी तहसील कार्यालयात बैठक घेतली. यात सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना करत दोन दिवसांत सर्व पंचनामे करून कागदपत्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.